Bala Bhegde, Sunil Shelke Sarkarnama
पुणे

Maval APMC Election : बाजार समितीच्या निमित्ताने बाळा भेगडे सुनील शेळके पुन्हा आमने-सामने

उत्तम कुटे

Sunil Shelke and Bala Bhegade : तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर आज स्पष्ट झाले. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील ही बाजार समिती यावेळी जिंकण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी आघाडीतील काँग्रेसच्या एका गटाला हाताशी धरले आहे.

मावळ बाजार समितीची (Maval) २०१० नंतर ही निवडणूक होत आहे. त्यावेळी १८ पैकी १७ जागा राष्ट्रवादी पॅनेलने जिंकल्या होत्या. यावेळी १८ जागांसाठी ४० उमेदवार आजच्या अर्जमाघारीनंतर रिंगणात राहिले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegde) पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोघांनीही ताकद लावल्याने या निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे.

दरम्यान, २०१९ ला विधानसभेला ते थेट भिडले होते. त्यावेळी शेळकेंनी भेगडेंची आमदारकीची हॅटट्रिक चुकविली. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आमदार शेळकेंनी बाजी मारली होती.

आता बाजार समितीसाठी आजी-माजी आमदारांनी आपापले पॅनेल उभे केले आहे. राष्ट्रवादीचे सहकार, तर भाजपचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी परिवर्तन आहे. सहकारची धुरा आमदार शेळके, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, बापू भेगडे आदी सांभाळत आहेत. तर, प्रतिस्पर्धी पॅनेलची जबाबदारी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde), भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रविंद्र भेगडे आदींकडे आहे. दोन्ही पॅनेलने काँग्रेसमधील एकेका गटाची मदत घेतली आहे.

मार्केट यार्ड नसूनही होतेय बाजार समितीची निवडणूक

पुणे जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांपैकी मावळसह भोर आणि मुळशीलाही मार्केट यार्ड नाही. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे साधन नाही. स्वतःचे मार्केट यार्ड तथा बाजार नसूनही गेल्या ५२ वर्षांपासून मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे, हे विशेष.

१५ सप्टेंबर १९७० ला ही समिती स्थापन झाली तेव्हा मावळातील गवत हे समितीमार्फत थेट काश्मिर आणि हिमाचलप्रदेशपर्यंत जात होते. लष्कराच्या घोड्यांना ते दिले जायचे. तेच एकमेव उत्पनाचे साधन होते, असे बबन भेगडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. बाजार समिती नसतानाही केवळ नाव आणि प्रतिष्ठेसाठी लाखो रुपये खर्चून मावळ बाजार समितीची निवडणूक लढवली जात आहे.

या समितीची तळेगाव स्टेशनला सात एकर जागा आहे. दाभाडे सरकारने ती दिलेली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत ११२ कोटी रुपये आहे. तिच्या तिन्ही बाजूंचे खासगी जागामालक हे समितीच्या जागेत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी जागाच देत नाहीत. त्यामुळे समितीला तेथे आतापर्यंत मार्केट यार्ड तयार करता आलेले नाही. दरम्यान, त्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. मात्र त्यास यश मिळाले नसल्याची खंत माजी सभापती बबनराव भोंगाडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT