Cyber fraud  Sarkarnama
पुणे

​Pune Extortion: 'रॉ' अधिकार्‍याचा आव अन् 'पोलीस मित्रा'चा डाव! ऑनलाईन खंडणी प्रकरणात थेट पुणे ते गुजरात कनेक्शन

Pune Extortion Case, Fake RAW Officer, Online Bank Account Freeze: राजकोटच्या व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून स्वतःला रॉ अधिकारी म्हणवत लाखोंची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील आरोपीला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Sudesh Mitkar

Pune Extortion Case: राजकोट गुजरात येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारातून फ्रीज करून, स्वतःला गुन्हे अन्वेषण विभागाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून खाते पूर्ववत सुरू करून देण्याच्या मोबदल्यात लाखांची खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे.

परेश प्रवीण कोठारी (वय ४२, रा. हॉटेल पंचमीजवळ, सातारा रस्ता, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो स्वतःला रॉ एजंट म्हणूनही मिरवत होता. याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याने पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री तक्रारदार व्यापाऱ्याच्या 'बँक ऑफ बडोदा' (राजकोट) येथील खात्यात वेगवेगळ्या खात्यांमधून अनुक्रमे १ हजार रुपयांचे दोन आणि २ हजार रुपयांचा एक, असे एकूण ४ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर लगेचच त्यांचे बँक खाते फ्रीज झाले. व्यापाऱ्याने बँकेत चौकशी केली असता, हे पैसे धनकवडी परिसरातील प्रवीण कोठारी आणि पुष्पा कोठारी यांच्या खात्यांमधून आल्याची माहिती मिळाली.

व्यापाऱ्याने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, आरोपी परेश कोठारी याने व्हॉट्सॲप कॉलद्वारे स्वतःची ओळख 'रॉ अधिकारी' म्हणून दिली. आपण अनेक लोकांची खाती अशाच प्रकारे फ्रीज केल्याचा दावा करत, खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम ४ लाख २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

'पोलिस मित्र' असल्याचे ओळखपत्र दाखवले

जून महिन्यात सातारा रस्त्यावरील 'सिटी प्राईड'जवळील कॅफे कॉफी डे येथे तक्रारदार आणि आरोपीची भेट झाली. त्यावेळी आरोपीने 'पोलिस मित्र' असे लिहिलेले ओळखपत्र दाखवून त्यावर 'परेश कोठारी' असे नाव असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. धमकी सत्र सुरूच राहिल्याने व्यापाऱ्याने वकिलांचा सल्ला घेऊन १३ जुलै रोजी गुन्हे शाखेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून व्हॉट्सॲप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली.

पोलिसांचे 'ऑपरेशन' आणि रंगेहात अटक

तक्रार दाखल होताच खंडणी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीत परेश कोठारीच खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सातारा रस्त्यावरील पंचमी चौक परिसरात पोलिसांनी जाळे विणले. परेश हा खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आला असता, पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले.

गुन्ह्याची मोडस ऑपेरंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परेश याने एका गुंतवणुकीच्या संकेतस्थळावरून तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर त्याने स्वतःच व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे पाठवले आणि लगेचच सायबर पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन ते खाते फ्रीज करायला लावले. खाते फ्रीज झाल्यानंतर व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून खंडणी उकळायची, अशी त्याची कटकारस्थानाची पद्धत होती. सध्या आरोपी परेश कोठारी पर्वती पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT