Girish Bapat, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Girish Bapat Passed Away : जमिनीशी नाळ ठेवणारे बापट राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; फडणवीसांची भावना

Pune News : "कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची बापटांची हातोटी"

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis News : खासदार गिरीश बापट (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज (ता. २९) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची भावना भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "भाजपचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे."

यावेळी फडणवीस यांनी बापटांच्या (Girish Bapat) आठवणींना उजाला दिला. फडणवीस म्हणाले, "देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. २०१४ ते २०१९ या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती."

बापट यांचे कामगार आणि शेतकरी हे जिव्हाळ्याचे विषय असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, "पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील."

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

बापट यांच्या पार्थिवावर सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

दरम्यान, सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT