Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

Girish Bapat Passes Away News: 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.
Girish Bapat
Girish Bapat sarkarnama
Published on
Updated on

Pune News : खासदार गिरीश बापट (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

Girish Bapat
Mumbai News : ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar यांच्यावर गुन्हा दाखल ; BEST कर्मचाऱ्यांच्या PF वर मारला डल्ला ?

भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून बापट ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध होते.

पुणे जिल्ह्यात शरद पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. याला पवार आणि बापट यांच्यात असलेले सुमधुर संबंध कारणीभूत असल्याची चर्चा अनेकदा पुण्याच्या राजकीय वर्तुळात होतच असते.

आणीबाणीच्या काळात बापट यांना 19 महिन्यांचा कारावास झाला होता. ते नाशिक जेलमध्ये होते. 1973 मध्ये टेल्को कंपनीत काम करताना त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली होती.

दांडगा जनसंपर्क, ‘सर्वसमावेशक’ नेता

पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट हे ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते.

एका कार्यक्रमात बापटांविषयी शरद पवार म्हणाले होते...

पुण्यात अनेकवेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून कसे येतात, असं शरद पवार चार महिन्यापूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात (अंकुश काकडे लिखित हॅशटॅग पुणे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात) म्हणाले होते. एकदा गिरीश बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही, अशी आठवणही पवारांनी सांगितली होती.

Girish Bapat
APP Posters Against BJP: मोदींच्या विरोधात APP ची मोहिम ; ११ भाषांमध्ये पोस्टरबाजी रंगणार

गिरीश बापट यांचे शिक्षण

  • गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला.

  • तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक शिक्षण.

  • त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले.

  • बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी.

  • 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले.

बापट यांचा राजकीय प्रवास

नगरसेवक ते खासदार

बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यानंतर ते जनसंघातून राजकारण आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.त्यांच्या आपली राजकीय जीवनाची सुरवात नगरसेवकपदापासून झाली. नगरसेवक-आमदार-खासदार अशा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष

पुणे महानगरपालिकेत १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

"कुणी कितीही करा आदळआपट..,कसब्यात फक्त गिरीश बापट"

1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.निवडणुक काळात कसबा पेठ परिसरात "कुणी कितीही करा आदळआपट..,कसब्यात फक्त गिरीश बापट" असे बॅनर लावलेले दिसायचे.

मोहन जोशींचा पराभव करुन खासदार ..

1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. यात त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com