Ankita Patil Sarkarnama
पुणे

Baramati LokSabha Constituency : संसदरत्न सुप्रिया सुळेंसमोर अंकिता पाटील-ठाकरे यांचा टिकाव लागणार ?

Ankita Patil, Baramati Lok Sabha Constituency: बारामती मतदारसंघात उमेदवार कोण असेल, याचे पत्ते भाजपने अद्याप खुले केले नाहीत. मात्र...

राजकुमार थोरात - Sarkarnama

Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. मात्र, भाजपने ए फॉर अमेठी व बी फॉर बारामती अशी घोषणा केल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करून वातावरण तापवले होते. भाजपने शरद पवार यांचे पुतणे व खासदार सुप्रिया सुळे यांचे चुलतबंधू अजित पवार यांना जवळ करून शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे राज्यातील गणिते बदलली आहेत. यामध्ये प्रामुख्याने बारामतीचा समावेश आहे. अजित पवार यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. बारामती मतदारसंघात उमेदवार कोण असेल, याचे पत्ते भाजपने अद्यापही खुले केले नाहीत. मात्र, सहा महिन्यांपासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांचे नाव चर्चेत आले आहे.

भाजपने पुणे जिल्ह्याच्या युवा मोर्चाची जबाबदारी अंकिता पाटील यांच्यावर सोपवली आहे. अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून युवकांचे संघटन वाढवले आहे. त्यांना पाटील कुटुंबाचा राजकीय वारसा आहे. त्यासोबतच ठाकरे कुटुंबाच्या त्या स्नुषा आहेत. त्यांचे सासरे दिवंगत बिंदूमाधव ठाकरे, पती निहार ठाकरे यांनाही समाजात एक स्थान आहे.

अंकिता यांचे चुलतआजोबा दिवंगत शंकरराव पाटील यांनी दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली असून सलग 28 वर्षे इंदापूरचे आमदार व 15 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. वडील हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या चार निवडणुका जिंकल्या असून 19 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केले आहे. नुकताच झालेल्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्या वाढदिवसाला त्यांचे भावी खासदार असे फ्लेक्स बोर्ड झळकल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाव (Name) :

अंकिता हर्षवर्धन पाटील-ठाकरे

जन्मतारीख (Birth Date) :

26 डिसेंबर 1990

शिक्षण (Education) :

मास्टर इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स), सस्टेनेबल फायनास अॅन्ड इनव्हेस्टमेंट (हार्वर्ड युनिव्हर्सिटी), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी).

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंकिता या कन्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 1995 मध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाची अपक्ष निवडणूक लढवून जिंकली. राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेल्या व्यक्तीमध्ये म्हणून पाटील यांची ओळख होती. एकेकाळी मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे नाव घेतले जात होते.

अंकिता यांच्या मातोश्री भाग्यश्री पाटील यांनी जिजाऊ महिला बचतगटाच्या माध्यमातून तालुक्यात महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. भाऊ राजवर्धन पाटील यांनीही परदेशात उच्च शिक्षण घेतले असून सध्या नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची जबाबदारी संभाळत आहेत. त्यांचा विवाह ठाकरे कुंटुबातील निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी 28 डिसेंबर 2021 ला झाला आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business) :

एस. बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्ष, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्ष व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालिका आहेत.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency) :

बारामती

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) :

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

अंकिता पाटील यांच्या आजी रत्नप्रभा पाटील यांच्या निधनानंतर 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या बावडा-लाखेवाडी गटाची पोटनिवडणूक लागली होती. ती पोटनिवडणूक अंकिता पाटील यांनी लढवली होती. राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व उमेदवारांत विक्रमी मताधिक्क्याने त्या विजयी झाल्या आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

अंकिता पाटील यांनी कोरोना महामारीतील लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत केली. इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोरोनाबाबत जनजागृती केली. डॉक्टरांची संख्या वाढवून घेतली. परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला. पीपीई किट, बेड, तसेच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली. कोरोना सर्वेक्षणामध्ये स्वतः सहभागी होऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली. इस्माच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या संदर्भातील अनेक कामे मार्गी लावली.

2019 मधील निवडणूक लढविली होती का ? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

अंकिता पाटील यांनी 2019 ची निवडणूक लढवली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती ? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

अंकिता पाटील यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. इंदापूर तालुका त्यांनी पिंजून काढला आहे. एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांशी सातत्याने त्या संवाद साधत असतात. त्यासोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करून आढावा घेत असतात. शाळा, महाविद्यालयांत मुलींसाठी व्याख्याने देतात. बचत गटांच्या महिलांशी हितगुज साधून त्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युवा मोर्चाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

अंकिता पाटील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह मोडमध्ये असतात. त्यांनी केलेली कामे, भेटीगाठी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून पोहोचविण्याचे काम करतात. फेसबुक, इन्टाग्राम तसेच व्हॉटसअॅपचा वापर प्रभावीपणे करतात. केंद्र सरकारच्या कामकाजाचे कौतुक सोशल मीडियावरून करतात. यासाठी त्यांची एक टीम आहे.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. 2024 ला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार होणार, अशी विधाने त्यांनी केली आहेत.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

हर्षवर्धन पाटील

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate):

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना संधी देण्याचे धोरण काही दिवसांपासून अवलंबले आहे. त्यानुसार अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. इंदापूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे महायुतीची ताकद वाढणार आहे. त्यासोबतच खडकवासल्यात भाजपचे वर्चस्व आहे. भोर, पुरंदर व दौंडमधील सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

खासदार सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मतदारसंघातील प्रश्न त्यांनी प्रभावीपणे संसदेमध्ये मांडून सोडवले आहेत. त्यांना अनेक वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मतदारसंघात त्यांचा संपर्क दांडगा असून, मतदारांशी भावनिक नाते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना येणाऱ्या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. अंकिता पाटील या नवख्या उमेदवार असल्यामुळे त्यांच्या पारड्यामध्ये मतदार वजन टाकणार का ? हाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences):

महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटणार, यावर बरेचसे अवलंबून राहील. भाजपला मतदारसंघ सोडल्यास अंकिता पाटील यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा एक लाख 56 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आता त्या इच्छुक नसल्याचे समजते.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जागा सुटल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावांची चर्चा आहे. अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तरी त्या पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत. पक्षाने जर याठिकाणी दुसरा उमेदवार दिला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे त्या पालन करतील.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT