Baramati Historic Political journey Sarkarnama
पुणे

Baramati Politics: 'माईं' ते 'वहिनी'; ६४ वर्षांनंतर महिलेच्या हाती धुरा! बारामतीत इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार?

Baramati Historic Political journey Malati Shirole TO Sunetra Pawar: मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले.

सरकारनामा ब्यूरो

रविकिरण सासवडे

काटेवाडी, (पुणे) : राजकारणाच्या सारीपाटावर कधी इतिहासाची पाने उलटली जातात, तर कधी भविष्याची नवी समीकरणे मांडली जातात. बारामतीच्या भूमीने अशाच एका ऐतिहासिक वळणावर आज पाऊल ठेवले आहे.

१९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे (माई ) यांच्या रूपाने बारामतीला पहिल्या महिला आमदार मिळाल्या होत्या. आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या अनपेक्षित बदलामुळे बारामतीच्या राजकारणात ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्वाच्या हाती धुरा येण्याचे संकेत मिळत आहेत.

१९६२ मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना त्यावेळी सर्वजण आदराने 'माई' म्हणत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात आईच्या मायेने उभ्या राहण्याच्या वृत्तीमुळे हे नाव जनमानसात रूढ झाले. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांना बारामतीची जनता गेली तीन दशके 'वहिनी' या नावाने ओळखते. 'माईं'च्या काळातील तो मायेचा ओलावा आज 'वहिनीं'च्या रूपाने बारामतीला पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.

मालतीबाई शिरोळे: सहकार आणि सत्तेचा पाया...

स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला नेत्यांमध्ये बारामतीच्या पहिल्या महिला आमदार मालतीबाई शिरोळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आणि बारामतीचा आवाज पहिल्यांदा एका महिलेच्या रूपाने विधानसभेत पोहोचला.

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले. १९६७ पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर बारामतीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रूपाने नव्या पिढीकडे आले.

काटेवाडीचा कायापालट

सुनेत्रा वहिनींचे कार्य केवळ कौटुंबिक चौकटीपुरते मर्यादित राहिले नाही. काटेवाडी या गावाचा त्यांनी केलेला कायापालट हा त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा जिवंत पुरावा आहे. 'राज्यातील आदर्श गाव' असा काटेवाडीचा प्रवास सुनेत्रा पवारांच्या जिद्दीमुळेच शक्य झाला. व्यवस्थापन, स्वच्छता आणि लोकसहभागातून विकास कसा साधता येतो, याचे मॉडेल त्यांनी महाराष्ट्राला दिले.

पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक दृष्टी....

केवळ विकासकामेच नव्हे, तर 'एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया' या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची मोठी चळवळ उभी केली. वारीच्या काळात होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'निर्मल वारी' अभियानाला त्यांनी दिलेले पाठबळ आणि त्याचे सूक्ष्म नियोजन मैलाचा दगड ठरले. जलसंधारण, प्लास्टिक मुक्ती आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी बारामतीची 'ग्रीन इमेज' तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार?

अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीवर शोककळा पसरली असली, तरी विकासाचा रथ थांबणार नाही याची ग्वाही सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेने दिली आहे. आगामी काळात त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली, तर १९६२ नंतर बारामतीला मिळणाऱ्या त्या पहिल्याच महिला आमदार ठरतील. बारामतीचा हा ऐतिहासिक राजकीय प्रवास आता कोणत्या दिशेला वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Mangesh Mahale) 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT