Digvijay Jagtap, Jitendra Pawar and Kiran Taware emerge as key contenders for Chairman post in Baramati Panchayat Samiti. Sarkarnama
पुणे

Baramati News : जगताप, तावरे की पवार? बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी चर्चेतील चेहऱ्यांमध्ये तगडी स्पर्धा

Baramati Panchayat Samiti Chairman Election : बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार आणि किरण तावरे यांची नावे चर्चेत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुमतामुळे अंतिम निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. तब्बल 20 वर्षांनंतर हे पद खुलं झाल्याने संपूर्ण तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच 3 नावांची चर्चा सध्या बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार पक्ष) बारामती पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागा जिंकल्या असून, 2 जागा भाजपला मिळाल्या आहेत. सभापती निवडीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात असल्याने, राष्ट्रवादीच्या 10 सदस्यांमधूनच एकाला ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सभापतीपदाच्या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलणार असल्याने, स्थानिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांचे लक्ष या निवडीकडे पूर्णपणे केंद्रित झाले आहे. आता पक्षप्रमुख कोणाला संधी देतात आणि कोणावर विश्वास ठेवतात, याकडे सर्वांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे.

दिग्विजय जगताप यांचा प्रबळ दावा

सरपंच दिग्विजय जगताप यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. केवळ 21 व्या वर्षी त्यांनी वाणेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सांभाळले होते. त्यांचे चुलते दिवंगत रामराजे जगताप हे बारामती पंचायत समितीचे पहिले सभापती होते. सध्या त्यांच्या पत्नी गीतांजली जगताप वाणेवाडीच्या सरपंचपदी कार्यरत आहेत. मितभाषी आणि अभ्यासू स्वभावाच्या दिग्विजय जगताप यांची कार्यक्षमता आणि पार्श्वभूमी यामुळे जगताप यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.

जितेंद्र पवार यांचेही नाव चर्चेत

वडगाव निंबाळकर गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले जितेंद्र पवार हे जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्व आणि स्थानिक प्रभावामुळे सभापतीपदासाठी त्यांचे नाव जोरदारपणे पुढे येत आहे. यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत तालुक्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता आणि चुरस कायम राहणार आहे.

पणदरे गणातील सदस्य किरण तावरे हे सभापतीपदासाठी मजबूत आणि प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. गेल्या 29 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत सातत्याने सक्रिय राहून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष आणि पक्षाचे युवकाध्यक्ष म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि अतुट निष्ठावंत म्हणूनही ते ओळखले जातात. अभ्यासू, सर्वसमावेशक स्वभाव आणि बारामती तालुक्यातील दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT