

शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले शिवनेरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक ठिकाणी पहिल्यांदाच भाषण करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा दिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित नसून स्वराज्य, स्वाभिमान आणि चांगल्या प्रशासनाची पुन्हा आठवण करून देणारा असल्याचे सांगितले. शिवनेरीवर उपस्थित राहणे हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत शपथ घेताना त्यांच्या मनात राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर उभा राहिला होता, असे त्या म्हणाल्या. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्म दिला नाही, तर त्यांना धैर्य, संस्कार आणि स्वराज्याची जाणीव दिली. संकटांवर मात करण्याची ताकद त्यांच्या विचारांतूनच मिळते, असे त्या म्हणाल्या.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
'ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती निष्ठा कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. शिवनेरीसह राज्यातील ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि विकासासाठी सरकार ठामपणे प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आठवण सांगताना त्या भावूक झाल्याचंही दिसून आलं..
पहाटेपासूनच शिवनेरी गडावर हजारो शिवभक्तांची उपस्थिती दिसून येत होती. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मंत्री शंभुराज देसाई आणि आशिष शेलार यांनीही छत्रपतींना अभिवादन केले.
शिवजयंतीनिमित्त गडावर विशेष सजावट करण्यात आली होती. शिवजन्मस्थळ फुलांनी नटवण्यात आले होते, तर संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. राज्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते, त्यामुळे गडावर उत्साहाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.