nitin atole
nitin atole Sarkarnama
पुणे

Baramati Politics : अजितदादांचा बारामतीतच काकांना धक्का; दूध संघाच्या माजी अध्यक्षांची 22 दिवसांतच घरवापसी

कल्याण पाचांगणे

Malegaon News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केलेले बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा 'युवा मिशन 2024' मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार गटात अनेक प्रवेश झाले. यामध्ये आटोळे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. (Sharad Pawar Group VS Ajit Pawar Group)

पुणे जिल्ह्यासह बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे काम मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी आराखडा तयार केला होता. या पार्श्वभूमीवर 18 जानेवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बागेत बारामतीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत स्थानिक राजकीय गटबाजीला कंठाळून बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, 22 दिवसांतच आटोळे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

"विकासाची घोडदौड अधिक गतीने पुढे नेण्याची धमक अजितदादांमध्ये आहे. त्यामुळे झालेले गैरसमज बाजूला ठेवत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचे ठरवले आहे", असे नितीन आटोळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

"बारामतीच्या राजकारणात गटबाजी वाढली आहे. त्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची तालुकास्तरावर काम करताना घुसमट होते. याबाबत अनेकदा अजितदादांकडे तक्रारी केल्या. मात्र, आमच्या म्हणण्याकडे लक्ष न दिल्याने आम्ही शरद पवार गटात प्रवेश केला होता. पण शरद पवार गटाकडे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रोग्राम नसल्याचे जाणवले.

तसेच अजितदादांनी आमचे म्हणणे समजून घेतले. याबरोबरच यापुढे संघटनात्मक काम करण्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला", असं नितीन आटोळे म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT