Nashik News: महायुतीमध्ये जागावाटप कसे होणार यावर रोज नवे दावे आणि प्रतिदावे पुढे येत आहेत. आता पुण्यातील राष्ट्रवादीचा एक मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिक मतदारसंघ देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील इच्छुकांनीही आता या मतदारसंघासाठी तयारी सुरू केली आहे. (Lok Sabha Elections 2024)
महाविकास आघाडीवर महाराष्ट्रातील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसल्याने महायुतीकडून टीका होते. प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या तीन घटक पक्षांमध्येच जागा वाटपावरून अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याच्या चर्चा बाहेर येत आहेत. त्यामुळे नेमके जागावाटप केव्हा होणार, ते चर्चेतून होणार की ऐनवेळी भाजप स्वतःचा हट्ट पुढे करून आपल्या मर्जीप्रमाणे जागा वाटपाचा प्रस्ताव देईल, याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक मतदारसंघाबाबत आता एक नवी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होईल अशी स्थिती आहे. मात्र महायुतीने घटक पक्षांतील कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळतील हे निश्चित झालेले नाही. आता नव्याने पुढे आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केलेल्या पुणे परिसरातील चार जागांपैकी त्यातील एका जागेवर भाजपने दावा केला आहे.
पुण्यामध्ये भाजपचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी हा प्रयत्न असेल. त्या बदल्यात नाशिकचा मतदारसंघ अजित पवार गटाने मागितल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. त्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेतून एकाच वेळी अनेक उमेदवार निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसते.
गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून नाशिक मतदारसंघात निवडणुकीची तयारी जोमात सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. या आधारे नाशिक मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. आज यासंदर्भात इच्छुक उमेदवार निवृत्ती अरिंगळे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्याला मोठी गर्दी होती.
अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे तसेच भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे असलेल्या या मतदारसंघात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने शिंदे गट अस्वस्थ आहे, तर भाजप त्यांच्या घटक पक्षांतील दावे प्रतिदावे करत याची मजा लुटत आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.