Sharad Pawar , Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Sharad Pawar on Eknath Shinde : "कुठं गटार तुंबलं.." शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा

Maharashtra Politics : फडणवीस हे त्यावेळी लहान होते.

सरकारनामा ब्यूरो

Baramati News : मुंबईत रविवारी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. वाहतुक कोंडी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी येथील कोस्टल रोड येथे जाऊन पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या पाहणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला. पवार माध्यमांशी बोलत होते.

पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं यावर पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर "कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो," अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पवारांनी समाचार घेतला.

एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी पवार साहेबांनी केली तर ती मुत्सद्देगिरी असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगाव. 1977 साली जेव्हा आम्ही सरकार बनवलं तेव्हा भाजप माझ्यासोबत होता. फडणवीस हे त्यावेळी लहान होते. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नसेल," असे पवार म्हणाले.

अज्ञानापोटी फडणवीस असं वक्तव्य करतात..

पवार म्हणाले, "फडणवीसांना तेव्हाचा इतिहास माहीत नव्हता. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये त्यावेळचा जनसंघातील उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. आणखी काही सदस्य होते. पण त्यावेळी फडणवीस हे कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्या काळातील फारशी काही माहिती नसेल. त्यांच्या अज्ञानापोटी ते असे वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांबद्दल फारसे भाष्य करण्याची गरज नाही,"

अजित पवारांबाबत निर्णय..

अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद नको असल्याचे म्हटलं आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, "अजित पवार किंवा कोणत्याही व्यक्तीच्याबद्दल निर्णय कोणी एक घेत नाही. त्यांच्यासह पक्षातील इतर व्यक्ती सामंजस्याने निर्णय घेतील.संघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावे, अशी भावना आहे. तेच मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT