Bhima-Patas Sugar Factory
Bhima-Patas Sugar Factory Sarkarnama
पुणे

दौंडकरांसाठी मोठी बातमी : तीन हंगामानंतर भीमा-पाटस कारखाना सुरू होणार!

सरकारनामा ब्यूरो

यवत (जि. पुणे) : गेली तीन हंगाम बंद असलेला दौंड (Daund) तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना (bhima-patas-sugar factory) येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. कामगारांना उद्यापासून ( ता. २१ ऑक्टोबर) कामावर बोलविण्यात आले आहे. कारखाना चालू होण्याला महत्व असल्याने सभासद व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. (Bhima-Patas co-operative sugar factory will start within the next month)

कर्नाटकातील निराणी ग्रुपने हा कारखाना चालवायला घेतला आहे. ग्रुपचे संचालक संगमेश निराणी, कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल, उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, कामगार संघाचे अध्यक्ष अर्जून दिवेकर यांनी आज कारखाना स्थळावरील कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत आमदार सुभाष कुल यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर निराणी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या बैठका घेत कामांच्या ऑर्डर आज दिल्या आहेत. कामगारांना उद्यापासून कामावर बोलविण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री कारखान्याच्या भोंग्याची चाचणी घेण्यात आली. भोंग्याचा आवाज उपस्थित कामगारांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॅार्ड केला आहे. एक ते दीड महिन्यात कारखाना सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आमदार राहुल कुल म्हणाले, कारखाना सुरू होत आहे याचा आनंद आहे. कामगार आणि सभासदांचे प्रश्न सोडविले जातील. कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहणार आहे. सभासदांच्या उसाचे गाळप करून उसाला योग्य दर दिला जाईल. निराणी ग्रुपला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.

संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांचे चिरंजीव सत्वशील शितोळे म्हणाले, या निर्णयाचे स्वागत करतो. खासगीला चालवायला देणे, हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. उशीरा का होईना पण कारखाना चालू होणार आहे, याचे समाधान आहे.

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, कारखाना सुरू होत आहे याचा आनंद आहे. पण तो सहकारात सुरू व्हायला पाहिजे होता. सभासदांच्या १०० कोटींच्या ठेवी कारखान्यात आहेत. सभासद म्हणून त्यांच्या हक्कांची जपणूक झाली पाहिजे.

भीमा कामगार संघाचे अध्यक्ष अर्जून दिवेकर म्हणाले, सभासद व कामगारांच्या हिताच्या दृष्टीने कारखाना चालू होणे महत्वाचे होते. दिवाळीच्या मुहुर्तावर आमच्यासाठी योग्य निर्णय झाला आहे. सर्व कामगारांना कामावर घेणार आहेत. कराराप्रमाणे आम्हाला थकित देणी व नियमित पगार मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT