Kailas Kadam & Sanjog Waghere Sarkarnama
पुणे

पिंपरीत राष्ट्रवादीविरोधात 'या' मुद्द्यावर भाजप - काँग्रेसचे एकमत

पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) प्रभागरचना निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागरचना मंगळवारी (ता.१ फेब्रुवारी) जाहीर झाली. ती करताना काही प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी (NCP) हस्तक्षेप करून ती असंविधानिक पद्धतीने केल्याचा आरोप भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी लगेचच केला. त्यातून राष्ट्रवादीला अनुकूल बनविल्याला दुजोरा मिळाला. तर, ती करताना शिवसेनेला सेफ करून कॉंग्रेसची, मात्र फरफट झाली आहे. त्याला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम (Kailas Kadam) यांच्या वक्तव्याने बळकटी दिली आहे. प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणा-यांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे ते म्हणाले आहेत. याव्दारे त्यांचा रोख हा राज्याच्या सत्तेतील आपला मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या दिशेने आहे.

प्रारुप प्रभाग आराखड्याचा सखोल अभ्यास करुन योग्य ठिकाणी आक्षेप व हरकत घेण्यात येईल. ज्या राजकीय व्यक्ती व पक्षांनी हस्तक्षेप केला असेल त्याबाबतही रीतसर हरकत पक्ष घेईल, असे म्हणणाऱ्या डॉ. कदम यांचा रोख हा राष्ट्रवादीच्या दिशेने आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्व जागांवर सक्षम उमेदवार देण्यासाठी पक्ष संघटना बांधण्याचे काम सुरु असून ही निवडणूक सक्षमपणे लढणार आहे, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहराची स्थापना कॉंग्रेसने केल्याचा दावा त्यांनी केला. शहराला कामगारनगरी म्हणून पक्षानेच नावलौकिक मिळवून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेशहरातील मतदार कॉंग्रेसबरोबर राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोयीस्कर प्रभागरचनेने यश मिळेल यावर शहर कॉंग्रेसचा विश्वास नाही, असे म्हणत शहराचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचा असेल, या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांच्या दाव्याची त्यांनी एकप्रकारे खिल्लीच उडवली.

दरम्यान, चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागरचना केल्याचा काहीच फरक राष्ट्रवादीवर पडणार नाही. कारण शहरवासियांनी आता पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच करायचं ठरवलेलं आहे. शहरातील नागरिक या निवडणुकीत भ्रष्टाचारी भाजपला घरचा रस्ता दाखविणार आहेत, अशी प्रतिक्रिया पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रभागरचनेवर दिली. भाजपने

२०१७ मध्ये खोट्या भुलथापा देऊन सत्ता मिळवली. परंतु, मागील पाच वर्षात भाजपचा भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार जनतेने पाहिला. जनतेचे हिताचे निर्णय न घेता चुकीचे निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे जनता भरडली. टक्केवारी लाटण्याचा उद्योग केला. कचरा, पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते विकासाच्याबाबतीत काही करता आलेले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून एकही घर उभे राहिले नाही. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे स्मार्ट सिटी बदनाम झाली. ज्या अनधिकृत बांधकामे, शास्तीकरांचे भांडवल करून भाजपने निवडणुका लढवल्या. त्या प्रश्नावर नागरिकांना वा-यावर सोडण्याचं काम केलं. याचा हिशोब या पालिका निवडणुकीत शहरातील नागरिक घेणार आहेत. जनतेने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येणार. शहराचा पुढचा महापौर पक्षाचाच असणार, हे निश्चित झाले आहे",असे वाघेरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT