Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

Nitin Gadkari : अधिवेशनाच्या निमित्ताने गडकरी टोचणार का भाजप पदाधिकाऱ्यांचे कान ?

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये भाजपची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक उद्यापासून (रविवारी) पार पडत आहे. या चिंतन बैठकीला राज्य आणि देश पातळीवरल 5 हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यातील वरिष्ठ भाजपचे नेत्यांसह केंद्रातील तब्बल डझनभर मंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षाची सत्ता असो वा नसो, सत्ता कशी चालवावी आणि प्रशासनावर वचक कसा ठेवावा, याचे डोस पाजणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुण्यात होणाऱ्या भाजपाच्या चिंतन बैठकीच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडकरींकडून उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी यांनी वारंवार भाजप नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कडक शब्दात कान टोचले आहेत. पक्षातले वरिष्ठ नेते असो, पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी कुठलाही मुलाहिजा न ठेवता नितीन गडकरी आपलं म्हणणं रोखठोकपणे मांडत असतात.

नुकत्याच झालेल्या गोव्यामधील कार्यक्रमांमध्ये देखील गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भाजप पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले होतं. 'चांगले दिवस आले म्हणून जुन्या काळातली प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष आपण विसरतो आहोत',असे गडकरी म्हणाले होते.

भाजप नेते नितीन गडकरी यांनी यापूर्वी देखील महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना शिंदे गटाला सोबत घेताना भाजपने अवलंबलेल्या पद्धतीबाबत अप्रत्यक्षपणे आपली नाराजी दर्शवली होती. भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारे एखादा पक्ष फोडून त्यांना सोबत घेणं कुठेतरी नितीन गडकरी यांना देखील रुचलेलं नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालेल्या महायुतीच्या पराभवाचं विश्लेषण त्यांच्या पद्धतीने तयार केलं असणार आहे.

भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पुण्यात येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची पीछेहाट का झाली? याबाबतच्या कारणांवर ते स्पष्टपणे भाष्य करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काय केले पाहिजे, याबाबत बोलण्याची शक्यता आहे.

भाजप अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे कान टोचणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप अधिवेशाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आता पक्षाचे नेते असलेल्या नितीन गडकरी यांचे कडवे बोल पचवावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT