Maharashtra political news : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टारप्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये 40 जणांची नावे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही नेत्यांची नावे या यादीतून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून शिंदे, पवार यांची नावे नसणार आहेत.
लोकसभा (LokSabha) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी ही निडणूक होणार आहे. यातील बहुतांश मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तेथे प्रचाराला सुरूवात देखील करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
26 मार्चला भाजपने निवडणूक आयोगाकडे आपल्या 40 स्टार प्रचारकांच्या नावांची यादी सादर केली होती. यामध्ये राज्याच्या बाहेरील २० जण तर राज्यातील २० नेत्यांचा समावेश होता. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश होता. पहिल्या दोन क्रमांकावर ही दोन नावे होती. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत आयोगाने काही सूचना केल्या होत्या त्यानंतर आता भाजपच्या (Bjp) वतीने स्टार प्रचारकांची नवीन यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही. राजकीय पक्षांच्या वतीने तयार केल्या जाणाऱ्या स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याबाबत निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950 नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजे, असा नियम आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर भाजपकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.महाराष्ट्रात (Maharashtra) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. 19 एप्रिल ते 20 मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. भाजपने स्टार प्रचारकांची नावे प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केली होती. शिवसेना आणि भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर शरद पवार यांच्या पक्षाने आक्षेप घेतला होता.आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या लोकांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करणे, हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चे उल्लंघन आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लक्ष वेधले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.