Pune BJP  Sarkarnama
पुणे

BJP News: एकहाती पालिकेची सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर नवं टेन्शन; पुण्यात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची जोरदार चर्चा; कारणही आलं समोर

Pune BJP Politics : नारायणपूरजवळील एका आलिशान रिसॉर्टवर 25 आणि 26 मे रोजी भाजपचे 119 नगरसेवक, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय 'निवासी प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिकेत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवूनही भाजप अंतर्गत धुसफूस आणि समन्वयाचा अभाव आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. महापालिकेतील सत्ता टिकवणे जितके सोपे होते, तितकेच आता पक्षांतर्गत गटबाजी आणि नगरसेवकांमधील नाराजी सांभाळणे भाजप नेतृत्वासाठी जिकिरीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर, संघटना आणि लोकप्रतिनिधींमधील विस्कळीत झालेला समन्वय पुन्हा रुळावर आणण्यासाठी पुणे भाजपने आता थेट 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा मार्ग स्वीकारला आहे.

नारायणपूरजवळील एका आलिशान रिसॉर्टवर 25 आणि 26 मे रोजी भाजपचे 119 नगरसेवक, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय 'निवासी प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेचे अधिकृत प्रशिक्षण रखडलेले असताना भाजपने घाईघाईने घेतलेल्या या 'खासगी' शिबिरामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

पालिकेचा मुहूर्त हुकला

पुणे महापालिकेच्या 165 सदस्यांच्या सभागृहात तब्बल 101 नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. महापालिकेचे कामकाज, बजेट, स्थायी समितीची प्रक्रिया आणि प्रशासकीय नियम याबाबत या नवख्या नगरसेवकांना गंध नसल्याने सभागृहात अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

प्रशासनाकडून अधिकृत सर्वपक्षीय शिबिर घेण्याची मागणी गेली पाच महिने रखडली आहे. दोनवेळा नियोजन होऊनही पालिकेला मुहूर्त सापडला नाही आणि आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली.

पालिका हतबल झालेली असतानाच भाजपने स्वतः पुढाकार घेत आपल्या नगरसेवकांसाठी थेट रिसॉर्ट बुक केले. त्यामुळे हे निव्वळ प्रशिक्षण आहे की नगरसेवकांचा 'पक्षीय ब्रेनवॉश'?, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे.

'समन्वय' की अंतर्गत नाराजी दाबण्याचा प्रयत्न?

वरवर पाहता हे शिबिर संघटनात्मक मजबुतीसाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी भाजपमधील अंतर्गत खदखद लपलेली नाही. महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही नव्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

निधी वाटपातील दुजाभाव, महत्त्वाच्या समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये ज्येष्ठ नेत्यांची मक्तेदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक या तीन मुद्द्यांवरून भाजपच्या नव्या नगरसेवकांमध्ये पक्षातच दोन गट पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनुभवी नेत्यांविषयी असणारी हीच नाराजी दूर करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांपूर्वी पक्षाची घडी बसवण्यासाठी हे 'रिसॉर्ट मंथन' आयोजित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बंगळुरू पॅटर्न पुण्यात

नारायणपूर येथील भाजप नगरसेवकाच्या रिसॉर्टवर या दोन दिवसीय शिबिराची जय्यत तयारी झाली आहे. उद्घाटन आणि समारोपासाहित एकूण 10 सत्रांचा मारा नगरसेवकांवर केला जाणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची तळागाळापर्यंतअंमलबजावणी,लोकप्रतिनिधींची संघटनात्मक जबाबदारी आणि शिस्त विशेष म्हणजे, नुकतेच बेंगळुरू येथे भाजपच्या वक्ता प्रशिक्षण शिबिरात पारंगत झालेले हायप्रोफाइल पदाधिकारी या नगरसेवकांचा 'क्लास' घेणार असल्याचे सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT