Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
पुणे

भाजप नेत्याकडून वळसे पाटलांचे कौतुक : भीमाशंकर बिनविरोध करण्याचा दिला शब्द!

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राज्यात भारतीय जनता पक्ष सोडत नाही. या पार्श्वभूमीवर भाजप (bjp) किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे सोमवारी (ता. ३१ जानेवारी) मंचर (ता. आंबेगाव) येथे तोंडभरून कौतुक करत भाजप भीमाशंकर साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेईल, असा शब्दही दिला. (BJP leader praises Home Minister Dilip Walse Patil)

सातगाव पठार भागाला वरदान ठरणाऱ्या पेठ (ता. आंबेगाव) प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजुरीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या भांडणात भारतीय जनता पक्षाने उडी घेतली आहे.

थोरात म्हणाले “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व बबनराव लोणीकर यांचेही पाणी पुरवठा योजना मंजुरीत योगदान होते. मुंबई येथे २०१८ मध्ये अशोकराव टाव्हरे यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व सातगाव पठारचे ग्रामस्थ यांची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली होती. नळ योजना मंजुरीची प्रक्रिया त्यावेळी सुरु झाली होती. नळ योजना मंजूर झाल्याचा आनंद झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनाही श्रेय आहेच. पण भाजपचाही उल्लेख होणे अपेक्षित होते.”

पोलिस दलाची प्रतिमा उंचावली

आंबेगाव तालुक्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकीत भाजप उतरणार का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय थोरात म्हणाले ‘‘गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर साखर कारखान्याने राज्य व देश पातळीवर नावलौकिक निर्माण केला आहे. पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. विनाकारण कारखान्याचा खर्च होता कामा नये. विरोधासाठी विरोध ही भाजपची भूमिका नाही. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपही पुढाकार घेईल. तसेच, वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून पोलिस दलाची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या कामाचा सार्थ अभिमान आहे.”

या वेळी आंबेगाव तालुका भाजपचे सरचिटणीस संदीप बाणखेले, भाजप पदवीधर आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा.उत्तम राक्षे, किरण कांबळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT