पारगाव (जि. पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून विस्तवही जात नसताना याच मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यात मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि शिवसेना उपनेते माजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या धामणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक या दोन्ही गटांनी एकत्र येत बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ग्रामदैवत म्हाळसाकांत खंडोबा देवाचा भंडारा उधळून एकूण १३ जागांवर सर्वपक्षीय सर्वांनुमते १३ नावे निश्चित करून निवडणूक बिनविरोध करण्यात आली. (Unopposed election of the society at Dhamani in Ambegaon)
येथील सर्वपक्षीय ग्रामस्थांची आज सोमवारी (ता. ३१ जानेवारी) बैठक झाली. यावेळी धामणी, शिरदाळे, ज्ञानेश्वरवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. त्याचा आदर्श समोर ठेऊन सोसायटीच्या एकूण १३ जागांसाठी सर्वांनुमते सर्वपक्षीय १३ नावे निश्चित करून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागात सातत्याने पडत असलेला दुष्काळ या वर्षी झालेला अत्यल्प पाऊस, त्यामुळे भेडवसणारी पाणीटंचाई त्यातच निवडणुकीचा खर्च नको. कार्यकर्त्यांमध्ये कटूता नको; म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला, असे पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी सांगितले.
यापुढेही स्थानिक स्तरावरील सर्व निवडणुका अशाच प्रकारे बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्याचे वसंतराव जाधव यांनी सांगितले. या वेळी रवींद्र करंजखेले, माजी उपसरपंच सतीश जाधव, वसंतराव जाधव, पत्रकार विठ्ठल जाधव, आनंद जाधव, वामन जाधव, सरपंच सागर जाधव, सुभाष गुलाबराव जाधव, गणपत भुमकर, डॉ. पाटीलबुवा जाधव, गणेश तांबे, मनोज तांबे, निलेश रोडे, अक्षय विधाटे, संतोष रणपिसे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. बोऱ्हाडे यांच्याकडे सर्वसाधारण आठ जागेसाठी- सतीश जाधव, रंगनाथ जाधव, बाळासाहेब बढेकर, बाळासाहेब बोऱ्हाडे, कोंडीभाऊ तांबे, जयदीप चौधरी, संजय जाधव, सुहास रणपिसे यांची, महिला प्रवर्गाच्या दोन जागांसाठी सुमन जाधव, शांताबाई बोऱ्हाडे यांची, इतर मागास प्रवर्गासाठी रामदास विधाटे, मागास प्रवर्गासाठी सुधाकर जाधव, भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी दीपक जाधव यांचे अर्ज दाखल केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.