Bjp Mla Sunil Kamble , Pune cantonment Board  Sarkarnama
पुणे

Sunil Kamble News : भाजप आमदार सुनील कांबळेंनी अजितदादांच्या कार्यकर्त्याच्या कानाखाली आवाज काढला

BJP MLA Sunil Kamble beat NCP office bearer : ससूनमधील प्रकार

Chaitanya Machale

Pune News : विकासाच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याला भाजप आमदार सुनील कांबळे यांनी कानाखाली आवाज काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली. ससून रूग्णालयात हा प्रकार झाला. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार कांबळे यांनी मारहाण करूनही अजितदादांच्या गटाकडून त्याची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ससूनमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाला देखील आमदार कांबळे यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. याआधीही आमदार कांबळे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून वेगळा गट स्थापन करणाऱ्या अजित पवार गटाने राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देत. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदे देण्यात आली. सत्तेत सहभागी झाल्याने अजितदादा गट, आणि भाजप, शिंदे गट शिवसेनेमध्ये दिलजमाई झाल्याचे चित्र असले तरी या तीन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही दिलजमाई झाली नसल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे. जितेंद्र सातव असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकारातून ससून रुग्णालयामध्ये तृतीयपंथासाठी विशेष वॅार्ड तयार करण्यात आला आहे. या वॅार्डचे उद्घाटन तसेच ससून मधील कामांची पाहणी करून त्याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांचे मनोगत सुरू असताना कँन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे तेथून बाहेर पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या सातव यांच्याबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना ड्युटी करत असलेल्या एका पोलिस शिपायाच्या देखील चिडलेल्या कांबळे यांनी कानाखाली लगावली.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार कांबळे यांनी केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. कांबळे यांना राग येण्यासारखे काहीही कृत्य उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून झाले नव्हते, मग असे असताना कांबळे यांचा तोल कसा गेला, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असतानाही पदाधिकारी तसेच पोलिस शिपाई याला मारहाण करण्याचे धाडस आमदार कांबळे यांचे कसे होते, अशी विचारणा केली जात आहे. कांबळे यांचे कोनशीलेवर नाव नसल्याने ते चिडले असल्याची चर्चा सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT