पुणे

कलियुगातील मलिकांनी राज्य धुळीला मिळविलं ; भाजपनं उडविली खिल्ली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी पत्रकार परिषदा घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर घणाघात करीत त्यांची खिल्ली उडवली आहे.

''मध्ययुगीन भारतात कित्येक नबाब होऊन गेले, त्यातील बहुसंख्य नबाब जनतेची काळजी घेणारे होते. मात्र लोकशाहीतील नबाबाला फक्त आपल्या जावयाची काळजी असल्याचे दिसत आहे,'' अशी टीका लाड यांनी केली. ''मलिक अंबर यांनी आपल्या राजाचे राज्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तर आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत,'' असा टोमणाही लाड यांनी लगावला आहे.

''मलिक अंबर यांना शेतकरी, तळागाळातील जनता यांच्याबद्दल कणव होती. मात्र नव्या युगातील मलिक यांना तळागाळातील लोकांची काहीही पर्वा नाही. तोंडाने शाहू महाराजांचा, महात्मा फुले यांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जप करीत प्रत्यक्षात त्यांच्या शिकवणीविरुद्ध हे नबाबसाहेब वागतात. जाणत्या राजाच्या तालमीत तयार होऊनही हे मलिक साहेब आपल्या जावयासाठी प्रजेकडे दुर्लक्ष करतात. राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या जावयाला वाचविण्याचा व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवितात. कलियुगातील आपल्याच नावाच्या या मलिक चे हे प्रताप पाहून स्वर्गातील मलिक अंबर नक्कीच अश्रू ढाळत असतील,'' अशा खोचक शब्दात लाड यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

''इतिहासकालीन स्वामिनिष्ठ कुशल प्रशासक, निजामशाहीचे प्रधान मलिक अंबर यांचा जनसेवेचा लौकीक कलियुगातील मलिक नावाच्या नबाबाने धुळीस मिळवल्याचा टोला प्रसाद लाड यांनी लगावला. शहाजीराजांचे मित्र असलेले निजामशाहीचे प्रधान मलिक अंबर यांनी जनतेच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साह्याने जनतेच्या उपयोगाची कित्येक कामे केली, याबद्दल त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र कलियुगातील मलिक हा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देऊन, त्यांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे. महाराष्ट्रप्रेमी मलिक अंबर हे व्यसनांच्या तीव्र विरोधात होते. तर 'महा'राष्ट्रवादी आधुनिक मलिक हे व्यसनांशी लढणाऱ्यांच्या विरोधात आहेत,'' अशा शब्दांत लाड यांनी मलिक यांची खिल्ली उडवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT