Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar, Gopichand Padalkar  Sarkarnama
पुणे

Bawankule On Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; पण बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी

उत्तम कुटे

Pune News: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस संतापली. राष्ट्रवादीने पडळकरांविरोधात निषेध आंदोलनं केली. याची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडळकरांच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल आज माफी मागितली. तसेच याचवेळी त्यांनी पडळकरांचे कान टोचले.

राजकीय मतभेद असतील, पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे हे अशोभनीय आहे, अशा शब्दांत बावनकुळेंनी पडळकरांना कानपिचक्या दिल्या. तसेच त्यांचे हे विधान राज्याच्या संस्कृतीला सोडून आणि भाजपच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, या शब्दात बावनकुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

पडळकरांशी याबाबत बोललो असून त्यांच्या विधानाबद्दल पवारांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते पुण्यात म्हणाले. प्रत्येक समाज महत्वाचा असून त्याच्या समस्या मांडाव्या लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून तो मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पडळकरांची भूमिका महत्वाची आहे. या समाजाला न्याय मिळावा ही भाजपचीही भूमिका आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्लॅन बी भाजपकडे आहे, असा दावा विरोधक करत आहेत. मात्र, हा दावा बावनकुळे यांनी फेटाळला.

विरोधकांना काहीच सूचत नसल्याने प्लॅन बी नावाचा फुसका बॉम्ब त्यांनी सोडला. मात्र, असा कुठलाच प्लॅन भाजपकडे नाही, असे बावनकुळेंनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार आमच्याकडे आल्यावर रोहित पवार यांना शरद पवारांचा वारसदार झाल्याचे वाटू लागले आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT