Ashwini Jagtap News Sarkarnama
पुणे

PCMC News : शांत, संयमी भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आपल्याच पदाधिकाऱ्यावर का भडकल्या ?

Ashwini Jagtap News : मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, असा थेट इशारा अश्विनी जगताप यांनी या वेळी दिला.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'महाविजय- २०२४'अभियान सुरू केले असून, त्यात महाराष्ट्रात ४८ पैकी महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचा एक भाग म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परवा (ता.११) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी भाजप (BJP) शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज सायंकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या वहिनी आणि पक्षाच्या चिंचवडच्या शांत, संयमी आमदार अश्विनी जगताप यांचा रुद्रावतार दिसला. त्या आपल्या पदाधिकारी नामदेव ढाकेंवर भडकल्या, त्याचीच मोठी चर्चा झाली.

मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, असा थेट इशारा अश्विनी जगताप यांनी या वेळी दिला. त्यांचे पती आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जानेवारीतील अकाली निधनानंतर फेब्रुवारीत झालेल्या पोटनिवडणुकीत त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. स्व. लक्ष्मण जगताप तथा भाऊ हे हेडमास्तर म्हणूनच ओळखले जायचे. त्यांच्यातील दरारा व धाक आज अश्विनी जगताप यांच्यात पाहायला मिळाल्याने उपस्थित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत त्याची मोठी चर्चा झाली. बैठकीचा प्रोटोकॉल पत्रकार परिषदेला पाळला न गेल्याने त्या संतापल्या.

त्यांनी नंतर 'सरकारनामा'शी बोलतानाही दुजोरा दिला. महिला म्हणून दुर्लक्षित केले जात असल्याची खंतही व्यक्त केली. पत्रकार परिषदेत त्यांची बसण्याची व्यवस्था काहीशी एका बाजूला, तर मध्यभागी दुसऱ्याच पदाधिकाऱ्यांची केल्याने शांत व संयमी अश्विनी जगताप या शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांच्यावर भडकल्या. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमाचे निरोपही वेळेत दिले जात नसल्याने त्यांचा राग निघाला असे समजले, तर ढाकेंनी मात्र त्या भडकल्याचा इन्कार केला. मी मागे बसल्याने पुढे या असे ताई म्हणाल्या, असे ते म्हणाले.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे बुधवारच्या दौऱ्यात मावळ लोकसभेतील पिंपरी-चिंचवड आणि मावळ (Maval) विधानसभा मतदारसंघांतील 'भाजप वॅारियर्स'शी संवाद साधणार आहेत. नंतर सायंकाळी सहा वाजता 'घर चलो अभियान' शहरात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या नऊ वर्षांतील लोकोपयोगी योजनांची माहिती देतील. त्यांचा 'रोड शो'देखील होणार असून, दौऱ्याची सांगता पिंपरी कॅम्पातील त्यांच्या सभेने होणार आहे, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि स्व. आ. लक्ष्मण जगताप यांचे लहान भाऊ शंकर जगताप यांनी दिली. मावळ लोकसभेतील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकाही होणार आहेत, असे ते म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT