Pimpri, 08 June : लोकसभेचे निकाल नुकतेच हाती आले. त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले, तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येऊन नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅट्ट्रीक उद्या (ता. ९) होणार आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीला जोरदार दणका बसल्याने राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी नाईलाजाने त्यांना काही तडजोडी कराव्या लागणार आहेत.
लोकसभेला (Loksabha Election) ज्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला लीड मिळाले नाही, तेथे त्या आमदारांचा पत्ता कट करण्याचा इशारा ‘चार सौ पार’चा नारा दिलेल्या भाजपने (BJP) दिला होता. पण, देशात त्यांचे संख्याबळ ५९ ने घटले. राज्यात ४१ वरून महायुती २०२४ ला १७ पर्यंतखाली आली. त्यामुळे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे.
राज्यात ४५ प्लस ची घोषणा दिलेले भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याची इच्छा बोलून दाखवावी लागली. दरम्यान, उद्याच्या मोदींच्या शपथविधीनंतर राज्य सरकार आणि भाजपच्या पक्ष संघटनेत फेरबदल होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रात एनडीएची पुन्हा सत्ता आली. पण, मतदारांनी जोरदार धडा दिल्याने दुधाने तोंड पोळलेल्या भाजपवर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्रातच नाही, तर राज्यातही भाजपला आपल्या महत्वकांक्षेला थोडी मुरड घालावी लागणार आहे. काही तडजोडी कराव्या लागणार आहेत.
त्यातील पहिली म्हणजे ज्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाले नाही, त्यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नाही, याचा ते गांभीर्याने विचार करणार होते. त्यांना उमेदवारी ते देणारच नव्हते. त्यांचा हा कित्ता महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीही गिरवणार होती. पण, लोकसभेच्या राज्यातील निकालाने त्यांना दणका दिला. म्हणून त्यापासून धडा घेत ते आता ही कारवाई करणार नसल्याचे समजते.
जर, केंद्रात २०१९ सारखी बहुमताने सत्ता आली असती, तर मात्र मताधिक्य न दिलेल्या आमदारांना भाजपने धडा शिकवला असता. पण, तसे झाले नाही. उलट महाराष्ट्रातील खासदारांचे संख्याबळ निम्यापेक्षा कमी झाले. विरोधी महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यामुळे त्यांना बारा हत्तीचे बळ मिळाले. त्यातून ते चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक आणखी मोठ्या त्वेषाने लढतील.
राज्यात सत्तापालट करण्याचा त्यांचा इरादा आहे. लोकसभेचा ट्रेण्ड हा विधानसभेलाही राहण्याचे संकेत मिळाल्याने महायुतीचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे भाजपही आपली तत्वे व नियमांना काहीशी गुंडाळून ठेवणार आहे. तशीही त्यांनी लोकसभेसाठी त्याला तिलांजली अगोदरच दिलेली आहे.
लोकसभा निकालाचा कल चार महिन्यांनीही तसाच राहिला तर महायुतीची राज्यातील सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती कायम ठेवण्यासाठी ते काही तडजोडी करतील, असा संभव आहे. त्यातूनच लोकसभेला लीड न दिलेल्या मातब्बर आमदारांना पुन्हा तिकीट देतील, अशी चर्चा आहे. अन्यथा ते बंडखोरी करतील वा आघाडीत जातील. तसे संकेत आताच मिळू लागले आहेत.
शिंदेसेनेचे काही आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेत येत्या काही दिवसांत प्रवेश करण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील कित्येक आमदारही हाच कित्ता गिरवून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे, त्यामुळे महायुती आता पुढील पावले अतिआत्मविश्वासाने घाईघाईत नाही, तर सावधपणे उचलेल, अशी अटकळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.