Daund Assembly : दौंडमध्ये अजितदादांसाठी ‘दगेबाज’ कोण....कोणी किती लीड दिले?

Baramati Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवार ह्या कांचन कुल यांच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे राहुल कुल हे सुनेत्रा पवार यांना दौंडमधून मताधिक्क्य मिळवून देतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
Ajit Pawar-Veerdhval Jagdale-Rahul kul-Ramesh Thorat
Ajit Pawar-Veerdhval Jagdale-Rahul kul-Ramesh ThoratSarkarnama

Pune, 08 June : भाजपचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात आणि सर्व सत्तास्थाने सोबत असूनही दौंडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना मताधिक्क्य मिळू शकले नाही. मागील दोन लोकसभा निवडणुकीत पडलेला पायंडा मोडीत काढत, नव्या चिन्हावर सुप्रिया सुळेंनी या वेळी दौंडमधून मताधिक्क्य मिळविण्यात यश मिळविले. आजी-माजी आमदारांनी आखडता घेतलेला ‘हात’, दुसऱ्या सत्तास्थानाची भीती आणि निकटवर्तीयांनी हातचे राखूनच काम केले. हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ‘मामेभावा’ला दौंडच्या आखाड्यात उतरवले. पण, दौंडकरांनी सुप्रिया सुळेंच्याच बाजूने कौल दिला, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना दौंडमध्ये फेरमांडणी करावीच लागणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना ९२ हजार ०६४ मते, तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना ६५ हजार ७२७ मते मिळाली आहेत. सुळे यांना दौंडमधून २६ हजार ३३७ मते अधिक मिळाली आहेत. वास्तविक मागील दोन लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विरोधात दौंडकरांनी (Daund) कौल दिला होता. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कांचन कुल यांना ७०५३ चे मताधिक्क्य मिळाले होते, तर २०१४ च्या निवडणुकीत महादेव जानकर यांना दौंडच्या जनतेने २५ हजारांचे मताधिक्क्य दिले होते. तो पायंडा मोडीत काढत यंदा सुळेंनी दौंडमधून लीड घेतले आहे.

सुनेत्रा पवार ह्या कांचन कुल यांच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे राहुल कुल हे सुनेत्रा पवार यांना दौंडमधून मताधिक्क्य मिळवून देतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात मागील विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर झाली होती. त्यात कुलांनी ७४६ मतांनी निवडणूक जिंकली होती. हे दोन्ही नेते अजितदादांसोबत होते. मात्र, या दोघांनीही विधानसभेप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्यासाठी ताकद लावली नसल्याची चर्चा आहे.

एकमेकांचे कट्टर विरोधक कुल-थोरात हे दोघे एकाच व्यासपीठावर आले खरे. मात्र, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे शेवटपर्यंत मनोमिलन झाले नसल्याचे दिसून आले. दोन्ही गटाची एकत्रित बैठकही होऊ शकली नाही. तसेच, दौंडमध्ये दुसरे सत्तास्थान निर्माण झाले तर आपल्याला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल, अशा अवस्थेत काहीजण दिसून आले. त्यामुळेच निवडणुकीत काहींनी हात आखडता घेतल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar-Veerdhval Jagdale-Rahul kul-Ramesh Thorat
Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis: बाळ्यामामा, प्रतिभाताई, बजरंग बाप्पा ठरले लईच ताकदवान; 7 जण जायंट किलर

निकटतर्वीयांकडून निराशा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौंड शुगर हा साखर कारखाना याच तालुक्यात आहे. भीमा पाटस बंद असताना याच काखान्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेण्याची तजबीज केली होती. तसेच, बाजारभावही इतर कारखान्यांप्रमाणे दिला होता. मात्र, दौंड शुगरची धुरा सांभाळणारे काही सहकारी झोकून देऊन काम करत नसल्याचे लक्षात येताच अजितदादांनी आपले मामेभाऊ जगदीश कदम यांना दौंडमध्ये उतरवले. मात्र त्याचाही फायदा झाल्याचे दिसून आले नाही.

घटना बदलण्याची भीती

दौंड तालुक्यातील निष्ठावंत भाजपने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी सुनेत्रा पवार यांना मतदान केले. मात्र, नरेंद्र मोदी हे सत्तेवर आल्यानंतर घटना बदलणार, हे महाविकास आघाडीने मतदारांच्या मनावर पक्के बिंबवले. त्यामुळे दौंडमधील सेक्युलर मतदारांनी अजितदादांऐवजी तुतारीला पसंती दिली.

जुने हिशेब चुकते झाले

पुणे जिल्हा नियोजन मंडळात दोन जागा बिनविरोध निवडून येण्याच्या शिल्लक होत्या. त्यावेळी दौंडमधील एक बुजुर्ग नेत्याला अजित पवारांकडून अपेक्षा होती. कारण त्यांच्या विरोधातील उमेदवार हा अजित पवारांच्या ऐकण्यातील होता. अजितदादांनी सांगितले असते तर समोरच्याने अर्ज माघारी घेतला असता, असा त्या नेत्याचा दावा होता. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे दौंडमधील त्या नेत्याला नियोजन मंडळावर जाण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला. असे बरेच जुने हिशेब दौंडमध्ये होते, ते या निवडणुकीत चुकते करण्याचे काम झाल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar-Veerdhval Jagdale-Rahul kul-Ramesh Thorat
Samadhan Autade : आमदार समाधान आवताडेंच्या मंगळेवढ्यात केवळ 10 गावांत भाजपला मताधिक्क्य!

फेरमांडणी करावी लागणार

अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा आहे. आमदारांचे पुरेसे पाठबळ दादांना मिळावे लागणार आहे. त्यासाठी हक्काचा पुणे जिल्हा संपूर्ण ताकदीने पाठीशी उभा करावा लागणार आहे. मात्र, बारामतीच्या शेजारच्या दौंडमधील निकटवर्तीयांकडून अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर अजित पवारांना फेरमांडणी करावीच लागेल, हे मात्र निश्चित.

नामदेव ताकवणे पवारांसोबत

दोन पिढ्यांपासून भाजपसोबत असणारे निष्ठावंत नेते नामदेव ताकवणे यांनी निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना राज्यस्तरावरील पद देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत झोकून देऊन सुप्रिया सुळे यांचे काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ताकवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.

Ajit Pawar-Veerdhval Jagdale-Rahul kul-Ramesh Thorat
Solapur Lok Sabha 2024 : फडणवीसांच्या परीक्षेत विजयकुमार देशमुख ‘पास’, तर सुभाष देशमुख ‘फेल’!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com