Jagdish Mulik  Sarkarnama
पुणे

Pune Loksabha : जगदीश मुळीकांनाही व्हायचंय खासदार; निवडणुकीचे रणशिंग फुंकले, प्रतीक्षा केवळ पक्षादेशाची

उत्तम कुटे

pune News : लोकसभेसाठी पुण्यात भाजपकडून आणखी एक नाव पुन्हा समोर आले आहे. वडगाव शेरीचे माजी आमदार आणि भाजपचे माजी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना आता खासदार व्हायचंय. तशी इच्छा त्यांनी ‘सरकारनामा’शी आज बोलूनही दाखवली. पक्षाने संधी दिली, तर पुण्यातून नक्की लोकसभेची निवडणूक लढवणार, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (Bjp's Jagdish Mulik wants to contest election from Pune Lok Sabha constituency)

लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारीही आपण सुरू केल्याचे मुळीकांनी सांगितले. तशी ती गणेशोत्सातूनही दिसून आली आहे. कारण पुण्यात लागलेल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा होर्डिंग्जमध्ये त्यांच्या फोटोमागे संसदेची नवी इमारत छापण्यात आली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही फोटो आहेत.

पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लागलेल्या फ्लेक्सवर त्यावेळी जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख होता. त्यातून त्यांनी पोटनिवडणुकीसाठी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी झाल्याने त्यांनी आता लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

मुळीक हे २०१४ मध्ये पहिल्यांदा पुण्याच्या वडगाव शेरीतून आमदार म्हणून निवडून आले होते. गतवेळी २०१९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील टिंगरे यांनी त्यांचा पराभव केला होता. पुण्याची न झालेली पोटनिवडणूक त्यांच्याच नाही, तर इतरही भाजप इच्छुकांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण ती झाली असती, तर चिंचवड विधानसभेप्रमाणे भाजपने तेथून बापट यांच्या घरातील व्यक्तीलाच भावनेच्या लाटेचा फायदा उठविण्यासाठी तिकीट दिले असते.

आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी पुण्याचा उमेदवार हा बापट कुटुंबाबाहेरील असण्याची शक्यता वाढली आहे. त्यातूनच मुळीकांसह इतरांनी तयारी सुरू केली आहे. माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT