Dattatray Bharane  Sarkarnama
पुणे

Dattatray Bharane : जनसन्मान यात्रेला येताना आपापल्या बायकांना आणा; आमदार भरणेंचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सल्ला

Vijaykumar Dudhale

Indapur, 20 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यात सध्या जनसन्मान यात्रा सुरू आहे. या जनसन्मान यात्रेला महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराची राळ उठवली आहे. या कार्यक्रमाला महिलांची असणारी उपस्थिती हे विशेष ठरत आहे.

आता याच जनसन्मान यात्रेला येताना आपल्या बायकांना घेऊन या, असा सल्ला इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याची जोरात चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा (Jan Sanman Yatra ) दुसरा टप्पा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा इंदापूर तालुक्यात येणार आहे. त्यानिमित्त इंदापूर शहारात (Indapur) कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षवेधी असावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जनसन्मान यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane ) यांनी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. महिला भगिनींसाठी सरकारने इतका चांगला निर्णय घेतला आहे, त्यामुळे महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा हा कार्यक्रम तुमच्या घरचा आहे, असे भरणे यांनी सांगितले.

याच वेळी बोलताना आमदार भरणे यांनी एका पदाधिकाऱ्याचे नाव घेत ‘......राजे तुम्ही तर याच. पण येताना तुम्ही तुमची बायकोपण घेऊन या.’ त्या वेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर भरणे यांनी हा चेष्टेचा विषय नाही. आबा तुमच्या घरच्यांनाही घेऊ या, असे पदाधिकाऱ्यांना सांगताना ‘मीपण माझी बायको आणणार आहे. माझी बायको कधीच राजकीय कार्यक्रमाला येत नाही. पण जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला आणणार आहे,’ असे भरणे यांनी स्पष्ट केले.

याच नियोजनाच्या कार्यक्रमात आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे घेत आपल्या बायकांना आणण्याचा सल्ला दिला, त्यामुळे आमदार भरणे यांनी इंदापूरमधील जनसन्मान यात्रेला महिलांची गर्दी होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT