Daund News
Daund News Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी फरारी; विनयभंगाचा जाब विचारणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड (Daund) शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख (Badshah Shaikh) फरार झाला आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. (Daund News)

दौंड शहरात २० ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या तरुणी व तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाला होता. दौंड पोलिसांनी विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात धुडगूस घालणाऱ्या टोळक्याविरूध्द त्वरित कारवाई करण्याऐवजी फिर्याद नसल्याचे कारण पुढे करून कारवाई टाळली होती. पीडित तरूणीने केंद्रीय आयोगाकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी २१ दिवसांच्या विलंबाने गुन्हा दाखल केला.

फिर्यादीनुसार बुधवारी (ता. ९ नोव्हेंबर) माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख याच्यासह वसीम शेख, रशीद इस्माईल शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास इस्माईल शेख, जिलानी शेख (सर्व रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर १० ते १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुंभार गल्ली परिसरात ९ नोव्हेंबरपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बादशहा शेख याने दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून २०१७ ते २०२२ दरम्यान काम पाहिले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून बादशहा शेख व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी जिलानी शेख (वय १९ , रा. कुंभार गल्ली, दौंड) या संशयित आरोपीस अटक केली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी आज (ता. ११ नोव्हेंबर) दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT