Chakan MIDC  Sarkarnama
पुणे

Chakan Industry: खड्डे, वाहतुक कोंडीमुळं हजारो रोजगार धोक्यात! चाकणमधील २० उद्योग स्थलांतरीत होणार; उद्योजकांनी घेतली एकत्रित पत्रकार परिषद

Chakan MIDC : एमआयडीसी व परिसरातील पायाभूत सुविधांच्या अभावाचा परिमाण; एक हजार कोटींची उलाढाल आणि चार हजार रोजगार धोक्यात

सनिल गाडेकर

Chakan Industry: देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसी आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरावस्थेचा फटका उद्योगांना बसत असून, सुमारे २० लघुउद्योग एमआयडीसीबाहेर स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उद्योग प्रतिनिधींनी दिली आहे. या उद्योगांचे स्थलांतर झाल्यास परिसराच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि चार हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे.

चाकण एमआयडीसीतील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे, अशी माहिती चाकणमधील उद्योजकांनी बुधवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली. एमआयडीसीतील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांपैकी जवळपास निम्म्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. काही ठिकाणी रस्ते वाहनांच्या ये-जा करण्यायोग्यही राहिलेले नाहीत. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या ट्रकमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी कामगारांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कच्चा माल आणि तयार मालाच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळित होत आहे, अशी माहिती ‘प्रमिला उद्योग सहकारी सोसायटीचे’ अध्यक्ष शंतनू कुलकर्णी, उपाध्यक्ष धनंजय शेडबाळे आणि ‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’चे मुख्य अधिकारी दिलीप बटवाल यांनी दिली. ‘चाकण नागरी कृती समिती’चे समन्वय कुणाल कड, प्रशांत टोपे, ‘चाकण इंडस्ट्रिअल असोसिअशन’चे अध्यक्ष जयदीप अक्कलकोटे यावेळी उपस्थित होते.

ऑटो हबचा दर्जा गमावण्याचा धोका

चाकण परिसरातील पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे गेल्या काही वर्षांत ५० हून अधिक उद्योग गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे चाकणचा देशातील प्रमुख ऑटो हब म्हणून असलेला दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती उद्योजकांनी दिली.

नोडल अधिकारी नेमावा

उद्योगासाठी आवश्यक असलेल्या संस्थापनांमध्ये अंतर्गत समन्वय नसल्याचा फटका उद्योगांना बसत आहे. त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधत आमच्या समस्या दूर करण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमावा. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषद, औद्योगिक संघटना आणि चाकण नागरी अभियान यांचा समावेश असलेली संयुक्त आढावा समिती स्थापन करावी, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

पाच किलोमीटरचे अंतर कापायला दोन तास लागत असेल, तर ही केवळ प्रवासाची समस्या राहत नाही; ती उत्पादन आणि रोजगाराची समस्या बनते. लघुउद्योगांना वाहतुकीमधील सततचा विलंब सहन करणे परवडत नाही. पायाभूत सुविधा अपयशी ठरल्या, तर गुंतवणूक बाहेर जाते, अशी माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य अधिकारी दिलीप बटवाल यांनी दिली.

उद्योग प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या?

  1. - गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचता यावे

  2. - विद्यार्थी वाहतुकीसाठी उपाययोजना

  3. - रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी

  4. - मान्सूनपूर्व देखभालीसाठी ‘चाकण रोड सेल’ची स्थापना करावी

  5. - वाहतूक कोंडीची ठिकाणे कमी करावीत

  6. - सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा

  7. - पुरेसा वीज व पाणीपुरवठा सुरळीत करावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT