Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेला मुंढवा येथील जमीन व्यवहारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या गैरव्यवहारावरुन अजित पवारांना टार्गेट केलं आहे. पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये दिली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, आता पुण्यातील आणखी एका मोठ्या जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
पुण्यातील थेऊर येथे असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 101 एकर जमिनीच्या विक्री व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्थगिती दिली आहे.यात महसूल विभागाची आवश्यक परवानगी न घेता ही जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आता यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहाराविरोधातच बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून तिची दखल घेण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 299 कोटी रुपयांच्या जमीन खरेदी–विक्री व्यवहाराला स्थगिती दिली आहे.हा उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी एकप्रकारे मोठा धक्काच असल्याचं मानलं जात आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे वर्चस्व आहे.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहाराला दिलेली स्थगिती अजितदादांसाठी धक्का असल्याची चर्चा आहे. तसेच आता जोपर्यंत या व्यवहारासंबंधीचा चौकशी अहवाल येत नाही,तोपर्यंत ही स्थगिती कायम असणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानं याची पुण्याजवळील थेऊर येथे असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहाराची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.कारखान्याची सुमारे 101 एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.हा संपूर्ण जमीन व्यवहार अंदाजे 299 कोटी रुपयांना करण्याची मान्यता या अगोदर देण्यात आली होती.
मात्र, यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या एवढ्या मोठ्या जमीन व्यवहारासाठी आवश्यक असलेली महसूल विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं आता अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.