Pune News : पुन्हा येईन शब्द उच्चारला किंवा कानावर पडला तरी डोळ्यासमोर एका झटक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढं येतं. या पुन्हा येईनवरुन त्यांना विरोधकांनी अनेकदा डिवचलं, हिणवलं.पण त्याच फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा सत्तेत परतल्यावर मोठ्या मनानं माफंही केलं. आता सीएम देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 'पुन्हा येईन' वरुन मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, हा शब्द मला चिपकला आहे. काळ वेळेनुसार त्याचा अर्थ बदलतो. मी पुन्हा आलोय... तर यापुढील पाच वर्षे सर्व विश्व मराठी संमेलनाला मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हणताच उपस्थितांनी दाद दिली.
मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चे उद्घघाटन शुक्रवारी (ता.३१) मुख्यमंत्री फडवणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उद्योग व मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकिर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही. अलिकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो असंही त्यांनी सांगितलं. तसेच त्यांंनी उदय सामंत मघाशी सांगत होते की, काही लोकांनी वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की, साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. इमोशनल लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
‘‘मराठी माणसांने अटकेपार झेंडा फडकवला होता. मराठे भारताच्या सिमांच्या रक्षणासाठी पानिपतच्या लढाईला गेले होते. या लढाईत अहमदशहा अब्दालीने तहाचा प्रस्ताव पाठविला, यात पंजाब, सिंध आणि मुलतानचा प्रदेश मागितला होता. मात्र हा प्रदेश दिला असता तर तो अफगाणिस्तानचा भाग झाला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईची प्रेरणा दिल्याने मराठे लढले आणि सीमा सुरक्षित केल्या. मराठी आणि हिंदवी स्वराज अटकेपार नेण्याचे काम मराठी माणसांनी केल्याचंही फडणवीसांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,‘‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कुंभमेळा भरला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातील (ता.जुन्नर) सातवाहनकालिन शिलालेख हा महत्वाचा पुरावा ठरला आहे. हा आपला गौरव असून, मराठी भाषा संवर्धनासाठी मातृभाषेतुन उच्चशिक्षण देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामाध्यमातून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होणार आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘1758 ला मराठी सैनिकांनी लाहोर मुलतान जिंकून अटकेपार झेंडा फडकवला होता. 1788 रोजी दिल्लीवर भगवा फडकवला होता. पानीपत मुळे आपल्या सिमा सुरक्षित राहिल्या. मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत ठेवला आहे. यामुळे मराठी भाषा एका जातीपुरती मर्यादित नाही ती वैश्विक आहे. मात्र आता मराठी माणसांमध्ये एकप्रकारचा न्यूनगंड आला आहे. हा न्यूनगंड दूर करण्याचे काम विश्व मराठी संमेलन करत आहे. पुढील पाच वर्षात एक तरी संमेलन परदेशात एका चांगल्या शहरात घेण्यात यावे.अशी सूचना त्यांनी केली.
या कार्यक्रमाला विविध देशांमधुन मराठी माणूस उपस्थित आहे. त्यांचा चांगला पाहुणाचार करा. नहीतर आपण जेवण करूनच आला असाल.... चहा घेऊनच आला असाल... असे मिश्किल पणे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांना चिमटा काढला. पवार यांच्या या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांनी दाद दिली.
मंत्री उदय सामंत म्हणाले,‘‘ मराठी भाषेवर आणि भाषकांवर आक्रमण होत असेल तर ते आक्रमक पद्धतीने परतवून लावले पाहिजे. या अन्यायाला आळा घालण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.