
MNS News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो भविष्यती असं यश मिळवत 288 पैकी 230 जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळवता आल्या. राज्यात विरोधी पक्षाला आवश्यक असणारा जागांचा आकडा गाठणंही आघाडीतील एकाही पक्षाला जमलं नाही.
तर यंदाच्या निवडणुकीत सगळी ताकद लावलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जवळपास दीडशे जागा लढवूनही त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. यानंतर मनसेनं आधी एकनाथ शिंदेंशी पंगा घेतला आणि आता महायुतीच्या निकालावरच संशय घेत राज ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही दुखावल्याची चर्चा आहे.
मनसेच्या बैठकीत पदाधिकार्यांनी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीत मनसेची एन्ट्री राहिली असा आरोप केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या (Mahayuti) निकालावरच संशय घेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जून 2022 मध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच महायुतीशी मिळती जुळती राहिली होती.राज यांची तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीकही वाढल्याचे दिसून आले होते. त्यातच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेसाठी महायुती मनसेला सोबत घेण्याची शक्यता वर्तवली जात होती.पण ते शक्य झालं नाही.
मात्र,देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंविषयी मोठी कबुली दिली होती. त्यांनी लोकसभेला आम्हाला मनसेमुळे फायदा झाला,पण विधानसभेला मात्र अगोदरच आम्ही तीन पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांना देण्यासाठी जागा आमच्याकडे नव्हत्या.
तरीदेखील इतक्या मोठ्या प्रवाहाच्याविरोधात मनसे लढली.पण महापालिकेच्या निवडणुकीत जिथे सोबत असेल तिथे आम्ही त्यांना सोबत घेऊ.हा एकप्रकारे भाजपकडून मनसेच्या महायुतीत एन्ट्रीला हिरवा कंदीलच मानला गेला होता. यामुळे निश्चितच मनसेच्या महायुतीतील 'एन्ट्री'च्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसे युतीत सहभागी झाली नाही.भाजपची मनसेसोबत युतीची तयारी होती,मात्र एकनाथ शिंदे यांची तयारी नसल्याने मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही,असा सूर शिवतीर्थावरील मनसेच्या बैठकीत पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली होती.
विधानसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीत सहभागी होण्यास इच्छुक होती. मात्र मात्र एकनाथ शिंदे यांची यासाठी तयारी नव्हती.त्यामुळे भाजपची इच्छा असून देखील मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही, असा आरोप करत मनसेच्या पदाधिकार्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती.
मनसेच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज झाल्याचं दिसून आलं होतं.तसेच मनसेला जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आले होते.त्याआधीच राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे,असं विधान करुन एकप्रकारे शिंदेंना दुखावलं होतं.
आधी एकनाथ शिंदेंशी पंगा घेतलेल्या राज ठाकरे यांनी आता थेट विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच संशय घेऊन भाजपसह अजितदादांनाही दुखावल्याची चर्चा आहे.त्यामुळे पुढील काळात होत असलेल्या मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीतील मनसेच्या महायुतीसोबततच्या युतीवर अनिश्चिततेची पुन्हा टांगती तलवार निर्माण झाली आहे.
कारण वरळी येथील मनसेच्या मेळाव्यात यावेळी राज ठाकरे यांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच संशय घेतला .महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला.ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा.कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला 132 जागा मिळाल्या, हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा ?
तसेच लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली 4 ते 5 आमदार असतात त्यांचे 15 आमदार आले ? शरद पवार यांचे 8 खासदार आहेत, त्यांचे इतके कमी आमदार ? चार महिन्यांत फरक पडला, लोकांच्या मनात? काय झालं, कसं झालं? हा संशोधनाचा विषय असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालाबाबत संशय व्यक्त करुन एकनाथ शिंदेंनंतर आता अजित पवारांच्या नेतृत्वासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.त्यांनी भाजपला जरी सॉफ्ट कॉर्नर दिला असला तरी महायुतीतील एका मित्रपक्षावरचा संशय देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीचं कारण ठरु शकतो.
राज ठाकरेंच्या संशयानंतर महाविकास आघाडीच्या ईव्हीएमवरील आरोपांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता आहे. विरोधी नेतेमंडळींनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत निकालामधील गडबडीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरुन काढत महायुतीवर निशाणा साधण्याचं टायमिंग साधलं आहे. त्यामुळे महायुतीतील मनसेच्या एन्ट्रीला खोडा बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.