Pune News: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता असूनही येथे समाधानकारक कामकाज करता येत नाही, पदाधिकाऱ्यांमधील वाद व समन्वयाचा अभाव, नगरसेवकांकडून केले जाणारे ‘उद्योग’ यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. यावरून भाजपमध्ये अस्वस्थता असून, त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या नगरसेवकांची शाळा घेऊन खरडपट्टी काढणार आहेत. ही बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची पुन्हा एकदा सत्ता प्राप्त होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. ही दोन्ही शहरे झपाट्याने वाढत असताना तेथील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन त्यांच्या मंजुरीचे मार्ग मोकळे करणे आवश्यक होते. पण या दोन्ही ठिकाणी पदाधिकाऱ्यांमधील वाद, समन्वयाचा अभाव यामुळे थेट शहराच्या विकासाला, नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या कामांना फटका बसत आहे.
निविदेच्या अटी व शर्तींवरून वाद होऊन कामे रद्द करण्याची नामुष्की वारंवार ओढावली जात आहे. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याने भाजपला अपयश येत आहे. पुण्यात तर राज्यातील सर्वोत्तम अधिकारी देऊनही कामे होत नसल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या पुण्यातील नगरसेवकांच्या बैठकीनंतरही कामकाजाच्या पद्धतीत फारसा फरक पडलेला नाही. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्या बैठकीत चुकीचे ठराव, उपसूचना मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी हट्ट करत आहेत. याची गंभीर दखल पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.
या दोन्ही महापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी सुधारत नसल्याने त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. त्यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी नगरसेवकांची कार्यशाळा भाईंदर पश्चिम उत्तन येथील रामभाऊ म्हाळजी प्रबोधिनीत होणार आहे. त्यातील स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असून, हे भाजप नगरसेवकांची शाळा घेऊन त्यांना आरसा दाखविणार आहेत. यावेळी दोन्ही महापालिकेत आत्तापर्यंत झालेल्या कामांचा, चुकांचा पढाही जाहीरपणे वाचला जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
‘‘पुणेकरांनी दिलेला जनादेश हा सत्तेचा माज मिरविण्यासाठी नाही, तर जबाबदारी उचलण्यासाठी आहे. महापालिका हा व्यवसाय नाही, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे तुम्ही गैरकारभार, उन्माद केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. तुमची प्रतिमा म्हणजे भाजपची प्रतिमा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत कान टोचले होते. त्यानंतर आता बैठकीत फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.