Pune Revenue Department Kesnand Land Scam News Sarkarnama
पुणे

Pune News: जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून एनए करण्याचा प्रयत्न; तलाठ्याच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघड

Pune Revenue Department Kesnand Land Scam News: केसनंद येथे बनावट सह्या आणि खोट्या आदेशांच्या आधारे शेती जमीन बिगरशेती करण्याचा प्रयत्न उघड झाला. सतर्क तलाठ्यामुळे हा प्रकार समोर आला असून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mangesh Mahale

Pune News: महसूल प्रशासनातील कागदपत्र पडताळणी व्यवस्था किती कमकुवत झाली आहे, याचे धक्कादायक उदाहरण केसनंद येथे समोर आले आहे. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व आदेशांचा वापर करून शेती क्षेत्र बिगरशेती करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या उच्चस्तरीय तपासातून नव्हे, तर एका सतर्क तलाठ्यामुळे उघड झाल्याने महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केसनंद येथील तलाठी शुभम बावळे यांनी कागदपत्रांची पडताळणी करताना संशय व्यक्त केला नसता, तर बनावट आदेशांच्या आधारे मोठा जमीन व्यवहार वैध ठरला असता. त्यामुळे केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर भविष्यात या जमिनीतील प्लॉट खरेदी करणाऱ्या नागरिकांचीही मोठी फसवणूक झाली असती.

धक्कादायक बाब म्हणजे लोणी काळभोर अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या हद्दीतील प्रकरणासाठी हवेली तहसील कार्यालयाच्या लेटरहेडवर आदेश सादर करण्यात आला होता. त्यावर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या होत्या.

एवढ्यावरच न थांबता भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मोजणी आदेश, पीएमआरडीएच्या आदेशांमध्ये फेरफार, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सहीचाही कथित वापर करण्यात आला.

इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करून ती महसूल कार्यालयांपर्यंत पोहोचतातच कशी? कागदपत्रांची पडताळणी करणारी यंत्रणा नेमकी कुठे अपयशी ठरत आहे? जर तलाठ्याच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघड झाला नसता, तर प्रशासनाला याची माहिती मिळाली असती का, याबाबतही चर्चा सुरू आहे.

केसनंद येथील शेतकरी बाबासाहेब हरगुडे यांनी बिगरशेतीसाठी फेरफार प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संशय आल्याने तलाठी बावळे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणली. चौकशीनंतर जिल्हा प्रशासनाने संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, हा प्रकार एकटाच आहे की अशाच पद्धतीने आणखी काही प्रकरणे महसूल विभागात घडली आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे महसूल विभागातील पडताळणी प्रक्रिया, दस्तऐवज सुरक्षा आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेची पोलखोल झाली असून प्रशासनाला आता अनेक कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT