

Shrirampur Crime News: श्रीरामपूर शहरात काल (सोमवारी) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते प्रशांत कहणे (Prashant Kahane) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने प्रशांत कहाणे हे थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
श्रीरामपूरमधील गोंधवणी परिसरात सोमवारी रात्री सुमारे पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार अचानक झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र गोळी लक्ष्यावर न लागल्याने कहाणे सुरक्षित राहिले. कहणे हे शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला आणि त्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
हल्लेखोर ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकीचा शोध सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.पोलिसांकडून सध्या विविध अंगांनी तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.