District Collector Jitendra Dudi addressing officials regarding the Special Intensive Revision Process scheduled to begin on June 20. sarkarnama
पुणे

SIR : पुणे जिल्हा प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'! शनिवारपासून मतदार याद्यांची 'सखोल' झाडाझडती; ९० लाख मतदारांवर नजर

Collector Jitendra Dudi : पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये व अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

Roshan More

Pune News : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून शनिवार दिनांक २० जून पासून विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही यशस्विरित्या राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्याने मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पाटी (शरदचंद्र पवार गट), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या आहे. जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्र असून आजअखेर ९० लाख ८४ हजार ०८८ इतकी मतदार संख्या आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये व अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत २० ते २९ जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व गणना अर्ज प्रिटींग, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदार गणना अर्ज घरोघरी जाऊन वितरण, ५ ऑगस्ट रोजी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावे आणि हरकती दाखल करणे, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर- दाखल हरकतींवर सुनावणी व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून दावे व हरकतींवर मंडल निहाय सुनावण्या घेण्यात येणार आहेत. सुनावणीची तारीख १० दिवस आधी जाहीर केली जाईल.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरीत केलेले गणना अर्ज राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले अधिकृत मतदार केंद्र प्रतिनिधी मतदारांकडून घेऊन दिवसाला ५० अर्ज जमा करुन देऊ शकतात.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. मतदार याद्यांमधील जास्तीत जास्त त्रुटी, चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असेपर्यंत दर बुधवारी दुपारी १.३० वाजता राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. त्याबैठकीस सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहून क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सादर कराव्यात, असे आवाहन डुडी यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT