Pune Lok Sabha Constituency 2024 : काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ पदाधिकारी आबा ऊर्फ उल्हास बागुल हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. बागुल यांनी सोमवारी नागपूर येथे जाऊन भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बागुल यांच्या या निर्णयामुळे शहर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
काँग्रेसचे (Congress) एकनिष्ठ पदाधिकारी अशी ओळख बागुल यांची होती. गेले 35 ते 40 वर्षांपासून ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून काम करत आहेत. लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी बागुल इच्छुक होते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवित काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेत्यांकडे यासाठी पाठपुरावादेखील सुरू केला होता. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत काँग्रेसने कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बागुल चांगलेच नाराज झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षातील एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून बाहेरून आलेल्या व्यक्तीलाच पक्षात स्थान मिळणार असेल तर उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बागुल यांनी आंदोलनदेखील केले होते.
काँग्रेस भवन बाहेर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून बागुल यांनी आपली नाराजी व्यक्त करत मूक आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे एकनिष्ठ, जुने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेस पक्षाशी गेली अनेक वर्षे एकनिष्ठ राहण्याचे काम केले. कधीही पक्षाच्या विरोधात भुमिका घेतली नाही. पक्ष विरोधात काम केले नाही, याचे फळ म्हणून अनेकदा काँग्रेसकडून आपल्याला डावलण्यात आले,असा आरोप बागुल यांच्याकडून केला जात होता.
35 ते 40 वर्षे सक्रीय राजकारणात सात ते आठ वर्षे काँग्रेसकडून पदे देण्यात आली. ज्यांनी 20 वर्षे काँग्रेसमध्ये काम केले, त्यांच्याकडे 16 ते 17 वर्षे पदे आहेत. इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना तर पायघड्या घातल्या गेल्या.
पक्षाचे वर्षानुवर्षे एकनिष्ठेने काम करणाऱ्यांना पदे देताना हात आखडता घेतला जातो. मात्र इतरांना आमदार, खासदारकीची उमेदवारी दिली जाते, अशी सल देखील बागुल यांनी बोलून दाखविली होती.
काँग्रेसकडून अन्याय होत असल्याची भावना वारंवार बोलून दाखविणारे आबा बागुल भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले चार वर्षापासून होती. मात्र त्यावर कोणताही निर्णय होत नव्हता. काँग्रेस एकनिष्ठ असलेले बागुल देखील काहीही निर्णय घेत नव्हते.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी बागुल यांची होती.पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरी नेत्यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत मागणी देखील केली होती. मात्र त्याची कोणतीही दखल काँग्रेसकडून घेण्यात न आल्याने बागुल नाराज झाले होते.
सोमवारी बागुल यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
आबा बागुल यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र अमित बागुल, हेमंत बागुल, कपिल बागुल तसेच राहुल जगताप हे देखील भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप (BJP) नेते फडणवीस यांची आणि आबा बागुल यांची पाऊन तास चर्चा झाली. पुढील काही दिवसांतच बागुल यांचा भाजपमध्ये प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.