Sharad Pawar, Congress Sarkarnama
पुणे

Baramati Lok Sabha Congress : काँग्रेसचं थेट शरद पवारांना 'चॅलेंज' ? बारामतीतून निवडणूक लढण्याची तयारी

सरकारनामा ब्यूरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकसभेची रणनीती ठरवताना काँग्रेसने नगर, नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आता राष्ट्रवादीचा काँग्रसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातूनही काँग्रसने निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते करत असून याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. काँग्रेसची ही भूमिका म्हणजे थेट शरद पवारांना 'चॅलेंज' मानली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. (Latest Political News)

देशात लोकसभा निवडणुकीत 'इंडिया'च्या नावाखाली भाजपविरोधी पक्ष लढणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. राज्यात मात्र काँग्रेसने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. दोन लोकसभा मतदारसंघासाठी एक निरीक्षक नेमून तेथील आढावा घेण्याचे काम सध्या काँग्रेसकडून सुरू आहे. दरम्यान, दक्षिण नगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी आदी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलेल्या काँग्रेसने थेट बारामतीतूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांचा आमदार कुणाल पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी दोन्ही मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तेढातून झालेला हिंसाचाराबाबत कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे पाटलांनी सांगितले. या दोन्ही मतदारसंघाचा आढावा वरिष्ठांच्या आदेशानेच घेतला असून याचा अहवाल त्यांना पाठवण्यात येणार असल्याचेही पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेनंतर वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरला. त्यानंतर काँग्रेसला कर्नाटक राज्यात मोठे यश मिळाले. यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदरासंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक मित्रपक्षांच्या मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसने बारामतीतूनही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून याकडे लक्ष आहे.

'असा' आहे बारामती लोकसभा मतदारसंघ

बारामती मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असून येथून खासदार सुप्रिया सुळेंची तिसरी टर्म आहे. या मतदारसंघात इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर-वेल्हे आणि खडकवासला हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यातील पुरंदर, भोर-वेल्हा येथे काँग्रेसचे आमदार आहेत. इंदापूर-बारामतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार असून दौंड आणि खडकवासला येथे भाजपचे आमदार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT