Pune News : शिरूरमधील घोडगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचे ११ महिन्यांचे पगार थकले आहेत. थकलेले पगार आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी कामगारांचे दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. परिणामी गेल्या वर्षभरापासून पगाराअभावी कामगारांची आर्थिक अवस्था दयनीय झाली आहे. या कामगारांना दिलासा देण्यासाठी आता शिरूर तालुक्यातील लोक पुढे आले आहेत. कामगारांना सोमवारी लोकसहभागातून जमा केलेल्या अन्यधान्याच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे. (Latest Political News)
घोडगंगा कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलनकर्ते कामगार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय जमणार आहेत. यावेळी शिवसेनेचे माऊली कटके आणि मनसेच्या पुढाकारातून तालुक्यातील लोकससहभागातून कामगारांच्या कुटुंबीयांसाठी धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी कामगारांच्या सभेला ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव काळे मार्गदर्शन करणार असल्याचे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले. कारखाना व्यवस्थानाशी चर्चा होणार असल्याचीही माहिती आहे. यावेळी काय तोडगा निघतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत कामगार नेते महादेव मचाले म्हणाले, "काम करूनही मोबदला मिळाला नसल्याने आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. थकलेला पगार न करता कारखाना व्यवस्थान आमच्याकडून पुन्हा मोफत काम करण्याची अपेक्षा करत आहे. व्यवस्थापनाच्या म्हणाण्याप्रमाणे शेतकरी आणि कारखान्याचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही दहा महिने पगाराविना काम केले. आता मात्र ते शक्य नाही. वर्षभर आमची आर्थिक स्थिती खालावली असून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही आंदोलन करत आहोत. आंदोलनाचा आज ४५ वा दिवस आहे, मात्र कारखाना व्यावस्थापन विचार करताना दिसत नाही."
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साखर आयुक्तांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामगारांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर कामगार खूश नसल्याने आंदोलन सुरु ठेवण्यात आला. याबाबत कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमदार अशोक पवारांनी कामगारांच्या कष्टाचा एकही पैसा बुडणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळाला असला तरी योग्य तोडगा कधी निघणार, याबाबत ना कारखाना व्यवस्थापन ना आंदोलनकर्त्या कामगारांकडून माहिती मिळत आहे.
या आहेत कामगारांच्या मागण्या :
त्रिपक्षीय समितीच्या करारातील ३३ महिन्यांचा १२ टक्के वेतनवाढीचा फरक देणे.
सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या महिन्यांचा थकीत पगार मिळावा.
प्रॉव्हिडंड फंड नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ अखेरील थकीत रक्कम द्यावी.
कामगार सोसायटीची एक वर्षापासून कपात केलेली थकीत रक्कम मिळावी.
सन २००९-१० पासून रिटेन्शन अलाउंस, कर्मचारी विमा कपातीची रक्कम त्वरीत भरावी.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार रक्कम द्यावी.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत फायनल पेमेंट करावे.
डिसेंबर २०१६ पासून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमची थकीत रक्कम द्यावी
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पगारातून कपात केलेली मदतनिधी रक्कम द्यावी.
(Edited By Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.