<div class="paragraphs"><p>Sandhya Savvalakhe</p></div>

Sandhya Savvalakhe

 

Sarkarnama

पुणे

'मेरे भाईयो और बहनो' म्हणणा-या बाबाने देशातील महिलांचा विश्वासघात केला

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : 'मेरे भाईयो और बहनो' म्हणणा-या पांढ-या दाढीवाल्या बाबाने देशातील महिलांचा विश्वासघात केला आहे, अशी बोचरी टीका कॉंग्रेसच्या (Congrss) महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे (Sandhya Savvalakhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव न घेता गुरुवारी (ता.16 डिसेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) केली. सात वर्षांपूर्वी निवडणूक काळात दिवसभर या बाबाची छबी दाखवण्यात येत होती. महिला त्यांच्या आश्वासनाला फसल्या आणि केंद्रात भाजपाचे (BJP) सरकार आले. हे शेतकरी आणि महिलांविरोधी सरकार घालविण्याचा निर्धार आता महिलांनी केला आहे, असे सव्वालाखे म्हणाल्या.

स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारत-पाकिस्तान 1971 च्या युध्दाच्या विजय दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महिला कॉंग्रेसने घेतलेल्या महिला मेळाव्यात सव्वालाखे बोलत होत्या.

विजय दिनी घेतलेला हा मेळावा म्हणजेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील कॉंग्रेसच्या विजयाची नांदी आहे, असे त्या म्हणाल्या. परिवर्तनाच्या या लढाईत राज्यातील महिला या डॉ. कदम यांच्या पाठिशी आहेत, असे सांगत आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीत शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे बहूसंख्य उमेदवार निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप आणि केंद्र सरकारविरुध्द कोणीही बोलले की ते लगेच ईडी, आयडीची चौकशी लावतात. ही लोकशाही कोणालाही अभिप्रेत नाही. केंद्र सरकारचे हे वागणे म्हणजे हुकूमशाही आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.

पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या मेळाव्याला डॉ. कदम, नवी मुंबई महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा उज्वला सावळे, प्रदेश महिला कॉंग्रेस सरचिटणीस संगिता तिवारी, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच, माऊली मलशेट्टी, हिराचंद जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT