Pune News : महाविकास आघाडी, महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सध्या मुंबईमध्ये जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे जागा वाटपाच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये इच्छुक असलेले नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला येत असल्याचा पाहायला मिळत आहे. यातच पुण्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांची तीनदा तर खासदार सुप्रिया सुळे यांची एकदा भेट घेतल्याने राजकीय जोरदार चर्चा रंगल्या आहेत. (Congress News)
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. यामध्ये शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच मतदार संघांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर, वडगाव शेरी,खडकवासला, शिवाजीनगर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
ठाकरे गटाकडून देखील वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक नेते मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी स्वपक्षातील नेत्यांबरोबरच महाविकास आघाडीतील इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदार संघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून शरद पवार पक्षाकडून अश्विनी कदम या इच्छुक आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून आबा बागुल हे इच्छुक आहेत. बागुल यांनी आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच शरद पवारांची पुण्यात आणि बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. आज देखील त्यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी त्यांनी केली असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. बागुल यांनी शरद पवारांसोबतच खासदार सुप्रिया सुळे यांची देखील काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यामुळे बागुल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये तिकिटासाठी सुरू असलेल्या फिल्डिंगबाबत जोरदार चर्चा आहे.
शरद पवार यांची भेट नवरात्र उत्सवा कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतली होती. मात्र, पर्वती विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे आणि त्या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार असल्याचे देखील आबा बागुल यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.