Baramati News: दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. महायुती आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीनीही ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले.पण उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असला ,तरी बिनविरोधची आशा संपुष्टात आली आहे. काँग्रेसनं माघार घेतल्यानंतरही या निवडणुकीत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याचं समोर येत आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत एकापेक्षा एक मोठे ट्विस्ट गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पवार कुटुंब,महायुतीनं संपूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसून आलं. तसेच सुनेत्रा पवारांच्या विरोधातील उमेदवाराच्या माघारीसाठी काँग्रेसच्या हायकमांडपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत अशा सगळ्यांना फोनाफोनीही केली. अखेर दाखल केलेला आकाश मोरेंची उमेदवारी मागे घेत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. पण यानंतरही करुणा मुंडे याही त्यांची उमेदवारी मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण तसा निर्णय झाला नाही.
स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी आपली बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला बारामतीतून माघार घेण्यासाठी सांगितले होते. मात्र, मी एक पोस्ट पाहिली आणि त्यानंतर मी माझा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं.
तसेच धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणी केल्यानंतर काँग्रेसने माघार घेतल्याची पोस्ट मी पाहिली. त्यामुळे मीही माघार घेणार नाही. अजित पवारांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, पण सुनेत्रा पवार आणि त्यांचे मुलगे अपघाताविषयी काहीही बोलत नाहीत. मोठे सत्ताधारी न्याय देऊ शकत नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा हक्कच नसल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे.
बारामती पोटनिवडणुकीत मी अनेक मुद्दे घेऊन चालणार आहे. याठिकाणी कोणालाही न्याय मिळणार नाही असं वातावरण आहे. पण मी वाईट गोष्टींच्या विरोधात लढणार असल्याचा निर्धारही करुणा मुंडे यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे यांनी मला लायकी नाही असे सांगितले. त्यांनी संपर्क केल्यामुळे काँग्रेसने माघार घेतली, असं वाटतं. पण ते काँग्रेसला विकत घेऊ शकता, मला नाही,असंही करुणा शर्मा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे यांनी पण ही निवडणूक हारलो, तरी जिंकल्यासारखंच असणार असून लढण्याचा इरादा व्यक्त केला आहे. करुणा मुंडे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुकीसाठी त्यांनी अर्जसोबत दिलेल्या प्रतित्रापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे दोन कोटी 34 लाख 50 हजारांची जंगम मालमत्ता आहे.त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 8 कोटी रुपयांची आहे.30 हजार रोख रक्कम आहे तर बँक आणि विविध ठिकाणी 87 लाखांची ठेवी आहेत.महिंद्रा थार गाडी त्यांच्याकडे आहे. तसेच तिच्या खरेदीसाठी त्यांनी 23 लाख रुपये खर्च केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.17 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी आयसीआयसीआय पॉलिसीमध्ये केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.