Sunil Shelke Vs Barne Sarkarnama
पुणे

Sunil Shelke Vs Barne : महायुतीतच जुंपली,राष्ट्रवादीचे शेळके हे बारणेंवर पुन्हा बरसले

NCP Vs Shivsena : 'सीओ' नियुक्तीवरून त्यांनी पुन्हा रुद्रावतार...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : राज्य सरकारमधील महायुतीच्या तीन पक्षांतच नाही, तर त्यांच्या स्थानिक नेत्यांतही सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षम सीओ विजय सरनाईक यांची टर्म पूर्ण व्हायच्या आत बदली करून त्यांच्या जागी अकार्यक्षम एन. के. पाटील यांना आणल्याबद्दल स्थानिक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) सुनील शेळके हे मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणेंवर दोन महिन्यांनंतर मंगळवारी (ता.२८) पुन्हा बरसले. त्यावर खासदार बारणे काय उत्तर देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

तळेगाव नगरपरिषदेचा बट्ट्याबोळ करून जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत, असा हल्लाबोल 3 ऑक्टोबरला आमदार सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) खासदार बारणेंवर पत्रकार परिषद घेऊन केला होता. सीओ पाटील यांना उपरोधाने कार्यक्षम अधिकारी असे संबोधून त्यांच्या बदलीची मागणीही त्यांनी त्यावेळी केली होती. पाटलांसारखा अकार्यक्षम सीओ आणला ते बारणे तळेगावच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. याच सीओ नियुक्तीवरून त्यांनी पुन्हा रुद्रावतार धारण केला.

कार्यक्षम सरनाईक यांची मुदतपूर्व बदली करून अकार्यक्षम पाटील यांना का आणले, याचे उत्तर बारणेंनी द्यावे, असे आव्हान शेळकेंनी दिले. तळेगावच नाही, तर वडगाव मावळ, लोणावळा आणि देहू असे मावळातील सर्वच सीओ बारणेंनीच आणून बसविल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तो कोणीही आणावा, फक्त तो कार्यक्षम असावा, अशी आपली माफक अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

तळेगावच्या सीओविरुद्ध पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी त्यांना आणले त्या श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne ) तळेगावातील दुरवस्थेची जबाबदारी घ्यावी, नगरपरिषदेत येऊन बसावे, तेथे जनता दरबार भरवावा, अशा फैरी त्यांनी झाडल्या.

आपल्या टर्ममध्ये केलेल्या कामांचा लेखाजोगा आ. शेळकेंनी या वेळी मांडला. उरलेल्या आठ-दहा महिन्यांत मतदारसंघातील राहिलेली कामे मार्गी लावणार, दिलेली आश्वासने पूर्ण करणार, त्यासाठी डीपीडीसीतून मावळ तालुक्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आणणार, असे त्यांनी तळेगावात पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ही माजी नगरसेवकांसह माजी आमदारांचीही जबाबदारी आहे, असे सांगत भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना चिमटा काढला़.(Mahayuti Allience)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT