Solapur News : शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे, त्यादृष्टीने दहा प्रमुख नेत्यांवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे सोपवली आहे. वास्तविक शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता, काँग्रेस-राष्ट्रवादीत तो काँग्रेसकडे होता. महाविकास आघाडीतही तो काँग्रेसकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. असे असताना ठाकरेंनी सोलापूर लोकसभेची जबाबदारी प्रभूंकडे देऊन वर्षेभर अगोदरच विधानसभेची तयारी सुरू केली आहे काय, असा सवाल या नेमणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Sunil Prabhu is responsible for Solapur Lok Sabha Constituency)
आमदार सुनील प्रभू यांच्याकडे सोलापूरबरोबरच धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. यातील धाराशिव वगळता इतर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने एकदाही लोकसभेची निवडणूक लढवलेली नाही. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे. आता भारतीय जनता पक्ष सोबत नाही, त्यामुळे धाराशिवची जागा राखण्याची जबाबदारी प्रभू यांच्यावर असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस आघाडीमध्ये सोलापूर, लातूर हे दोन मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे, तर धाराशिव, बीड हे राष्ट्रवादीकडे होते. महाविकास आघाडीत या मतदारसंघात अदलाबदल होऊ शकते. मात्र, सोलापूरमध्ये काँग्रेसकडे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे मातब्बर नेते असल्यामुळे तो शिवसेनेकडे जाईल, अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. याशिवाय शिवसेनेकडे तेवढ्या तोलामोलाचा नेताही नाही, त्यामुळे सोलापूर काँग्रेसकडे राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, प्रभू यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी देऊन शिवसेनेने काय साध्य केले, असा प्रश्न आहे.
सुनील प्रभू यांच्यापुढे आता धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा निवडून आणणे हेच असणार आहे. कारण निंबाळकरांची लढाई ही राणाजगजितसिंह पाटील यांच्याशीच पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप पहिल्यांदाच सोबत नसल्याने धाराशिव जिंकणे शिवसेनेपुढे आव्हान आहे. ते सुनील प्रभू यांना पेलावे लागणार आहे.
दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. पूर्वी दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. तसेच, सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून शिवशरण पाटील बिराजदार हे निवडून आले होते. बार्शीतून राजेंद्र राऊत निवडून आले होते. मोहोळमध्ये शिवसेनेची ताकद आहे. या मतदारसंघाचा काही भाग असलेल्या उत्तर सोलापूरमधून उत्तमप्रकाश खंदारे हे आमदार म्हणून निवडून येऊन मंत्री झाले होते. मात्र, नेतेमंडळींना पक्ष वाढविण्याऐवजी आपल्या खुर्चा कशा शाबूत राहतील, याकडे लक्ष दिल्याने संधी असूनही पक्षाची वाढ होऊ शकलेली नाही.
शिवसेना नेत्यांमधील विसंवाद, शह काटशहच्या राजकारणामुळे सोलापुरात शिवसेना म्हणावी त्याप्रमाणात वाढू शकलेली नाही. शिवसेनेच्या वाढीला जिल्ह्यात संधी होती, पण स्थानिक नेत्यांच्या हेव्यादेव्यामुळे पक्ष मागे पडत गेला. याउलट सोलापूर शहरापुरते मर्यादित असलेल्या भाजपने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करत पक्ष वाढवला आहे.
आता सुनील प्रभू यांना सोलापूर लोकसभेची जबाबदारी देऊन विधानसभेची तयारी पक्षाने सुरू तर केली नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातही महाविकास आघाडीत विधानसभेचे किती मतदारसंघ शिवसेनेकडे येणार, किती मतदारसंघात निवडणूक लढवणार या प्रश्नांचे उत्तर मिळण्यास आणखी अवधी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.