Prataprao Patil Sarkarnama
पुणे

Indapur Politics : इंदापुरात भरणेंना धक्का; मेहुण्याची सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला हजेरी

Prataprao Patil Attend Supriya Sule Event : प्रतापराव पाटील हे शरद पवार गटात जाऊन स्वतःचे वेगळे राजकारण करतील, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

Vijaykumar Dudhale

बाळासाहेब तांबे

Indapur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांना इंदापुरात धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कारण आतापर्यंतच्या राजकारणात खंबीर साथ देणारे भरणेंचे मेहुणे, इंदापूरचे माजी आमदार गणपतराव पाटील यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अखेर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यामुळे ते शरद पवार गटात जाऊन स्वतःचे वेगळे राजकारण करतील, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. (Dattatray Bharne's brother-in-law attends Supriya Sule's Melva)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यात सतत दौरे हाेत आहेत. प्रत्येक दौऱ्यावेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा नवा नेता सुळे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी आमदार (स्व.) गणपतराव पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. गणपतराव पाटील यांच्या शब्दाखातर शरद पवारांनी सिनार माससारखा कागद प्रकल्प भिगवणजवळ आणला. त्यातून तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळाला, त्याबरोबरच आर्थिक उन्नती झाली.

शरद पवारांनी १९९५ मध्ये हर्षवर्धन पाटील यांना डावलून गणपतराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीचा त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. परंतु त्यांनी पवारांची साथ सोडली नाही. पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर गणपतराव पाटील यांना काँग्रेसने कितीही आमिषे दाखवली तरी त्या आमिषाला बळी न पडता पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.

माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर शरद पवार स्वतः अंत्यविधीला उपस्थित होते. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पवारांचा कार्यक्रम असला की प्रतापराव पाटील यांच्या घरी भेट दिल्याशिवाय पवार हे पुढे जात नसायचे, त्यामुळे प्रतापराव पाटील यांना शरद पवारांनी नेहमीच ताकद दिली.

प्रतापराव पाटील यांचे मेहुणे दत्तात्रेय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर पवारांनी त्यांना ताकद देण्यास सुरुवात केली. त्यामुळेच तर २०१२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे प्रतापराव पाटील यांचा वालचंदनगर-कळस गटातून उमेदवारीसाठी प्रबळ दावा असतानाही अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली आणि भरणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. पुढे आमदार, मंत्री झाले, आताही ते आमदार आहेत. जवळपास ४० वर्षे जिल्हा परिषदेत असूनही प्रताप पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यांनी काही काळ बंडही केले होते; परंतु भरणेंमुळेच आपली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी गेली, याची सल प्रताप पाटील यांच्या मनात कायमच होती.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यानंतर तेवढाच जनसंपर्क असणारा, लोकांच्या कामाच्या उपयोगी पडणारा असा वजनदार नेता म्हणून प्रताप पाटील यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे भरणेंनी अजितदादांना समर्थन दिल्यानंतर प्रताप पाटील यांनी आपला सावता सुभा उभारण्याच्या विचाराने तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही ना, असा सवाल विचारला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत दत्तात्रेय भरणे हे अजित पवार गटाकडे, तर त्यांचे मेहुणे प्रताप पाटील हे शरद पवार गटाकडे गेल्यास इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक चुरशीचे मतदान होणार आहे. प्रताप पाटील हे आगामी काळात खासदार सुळे यांना साथ देणार की आपली तलवार म्यान करत पुन्हा मेहुणे दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी उभे राहणार की स्वतंत्रपणे राजकारण करणार, याची उत्सुकता इंदापूर तालुक्याला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT