Pandharpur-Mangalveda Politics : पंढरपूर-मंगळवेढ्यात भालकेंच्या माध्यमातून बीआरएसचा करिश्मा चालणार का?

BRS News : तेलंगणाबाहेर आपल्या पक्षाची विजयी पताका फडकवण्यासाठी बीआरएसचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्याकडून भालके यांना सर्वतोपरी मदत केली जाण्याची शक्यता आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलत असताना दक्षिण भारतातील बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) पंढरपुरातून पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव केला. आमदार (स्व.) भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि बीआरएस अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. भालकेंच्या रूपाने बीआरएस आपले बस्तान बसवणार का? अशी चर्चा सुरू आहे. (Will the charisma of BRS work through Bhalke in Pandharpur-Mangalveda?)

महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी बीआरएसने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील बहुतांश राजकीय नेत्यांना पक्ष प्रवेश द्यायला सुरुवात केली. त्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा प्रवेश सर्वाधिक चर्चेचा ठरला. जून महिन्यात केसीआर हे सुमारे ५०० वाहनांचा ताफा घेऊन आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरातील भालके यांच्या गावी सरकोलीत आले होते. त्या मेळाव्यात भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर केसीआर यांनी भालके यांची सहसमन्वयकपदी निवड करत पुणे विभागाची जबाबदारीही दिली.

Bhagirath Bhalke
Cabinet Expansion : राष्ट्रवादीच्या आणखी तिघांना मिळणार मंत्रिपद; घटस्थापनेचा मुहूर्त, ‘ही’ तीन नावे चर्चेत

दिवंगत नेते भारत भालके यांनी तीन वेळा पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांच्या निधनानंतर मे २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला. समाधान आवताडे यांनी भगीरथ यांचा ३७३३ मतांनी पराभव केला.

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साखर कारखानदार अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या भगीरथ भालके यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भारत राष्ट्र समितीमध्ये पक्ष प्रवेश केला. त्यावेळी भालके यांनी मोहोळ आणि पंढरपूरचा पोपट असा टोला लगावत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि पक्षाविरोधात दंड थोपटले.

राष्ट्रवादी-भाजपचे कडवे आव्हान

तेलंगणात बहुमताने सत्तेत असलेल्या बीआरएसला देशाच्या राजकारणात पाय रोवायचे आहेत. त्यामुळे तेलंगणाबाहेर आपल्या पक्षाची विजयी पताका फडकवण्यासाठी बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्याकडून भालके यांना सर्वतोपरी मदत केली जाण्याची शक्यता आहे. बीआरएसकडून शेतकरी, युवक आणि कष्टकरी या तीन मतदार वर्गाच्या प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा अजेंडा ठरलेला आहे. मात्र, या मतदारसंघातील आणि राज्यातील राजकारणाची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भगीरथ भालके यांच्यासाठी आगामी निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सध्याचे आमदार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अभिजित पाटील यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Bhagirath Bhalke
Solapur NCP News : भविष्यात दाऊदला भाजपत घेतलं तरी फडणवीस त्याचं स्वागत करतील : महेश कोठेंची टीका

परिचारकांची भूमिका महत्त्वाची

भाजप आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यावर वर्चस्व आहे. तालुक्यातील २४ गावांचा प्रलंबित पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी ते आवाज उठवत आहेत. त्यातच भाजपने पुन्हा आवताडे यांना उमेदवारी दिली आणि पंढरपुरात परिचारक गटाकडूनही मदत मिळाली तर त्यांची दोन्ही तालुक्यांतील मतदारांची जुळवाजुळव सोपी होणार आहे.

अभिजित पाटलांशी दोन हात करावे लागणार

दुसरीकडे एकामागोमाग चार साखर कारखान्यांची यंत्रणा हातात घेणारे अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आहेत. पाटील यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात गावभेटी सुरू केल्या असून, मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. तसेच, यापूर्वीच पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भालके गटाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भालके यांना भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्या विरोधात जास्त कंबर कसावी लागणार आहे. भारतनानांविषयी सहानुभूती दाखवणाऱ्या मतदारांची जुळवाजुळव करताना स्थानिक गटतट एकसंध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे.

Bhagirath Bhalke
Ajit Pawar CM News : भाजप मंत्र्याने उडवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची खिल्ली...

पक्ष प्रवेशानंतरही भालके शांतच

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भालके यांना बीआरएसमध्ये पक्ष प्रवेश दिल्यानंतर भालके यांना पुणे विभागाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत भालके यांच्याकडून शेतकरी, युवा, कामगार मेळावे, गावभेटी, पक्षविस्तार यांसारख्या गोष्टींवर म्हणावा तसा भर दिसून येत नाही. बीआरएस हा पक्ष स्थानिक मतदारांसाठी नवीन आहे. त्याची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोचवणे, पक्षाविषयी एक विश्वासाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सध्या लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता तेलंगणाच्या विधानसभा निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे बीआरएसचे प्रमुख नेतेही तेलंगणाव्यतिरिक्त दुसऱ्या राज्यात लक्ष घालताना दिसून येत नाहीत.

Bhagirath Bhalke
Bawankule Statement : आम्हालाही वाटतं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; पण..., भाजपच्या बावनकुळेंचे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com