Beed : राज्याच्या सत्तेत सहभागी होताच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्रिपद घेतल्यानंतर त्यांच्याकडीलच महत्त्वाचे अर्थमंत्रिपदही मिळविले. चार दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना पालकमंत्रिपदेही मिळवून दिली. शिवसेनेवर शिरजोर होणाऱ्या राष्ट्रवादीला आणखी तीन मंत्रिपदे मिळणार आहेत. केवळ पितृपक्षामुळे मुहूर्त लांबला असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी घटस्थापनेचा मुहूर्त ठरल्याची खात्रिशीर माहिती आहे. (Three more of NCP will get ministerial post)
सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नगरचे आमदार संग्राम जगताप यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. यातील मकरंद पाटील यांना कॅबिनेट, तर सतीश चव्हाण व संग्राम जगताप यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे राष्ट्रवादीतील खात्रिलायक सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस तीन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. तसेच वित्त व नियोजन हे महत्त्वाचे खातेही त्यांच्याकडे आले. त्यांचे सहकारी दिलीप वळसे पाटील यांना सहकार, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण, संजय बनसोडे यांना युवक कल्याण व क्रीडा, अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन, आदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण, धर्मरावबाबा आत्राम यांना अन्न व औषध प्रशासन अशी महत्त्वाची खातीही मिळाली. वित्त, सहकार, महिला व बालकल्याण अशी तगडी खाती मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले.
एन्ट्रीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस व विशेषत: अजित पवार सरकारमध्ये डॉमिनेटिंग असल्याने शिवसेनेची अस्वस्थता कायम आहे. त्यानंतर चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांसारख्या भाजपच्या तगड्या नेत्याकडील पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांना मिळाले. बीडचे पालकमंत्रिपद भाजपच्या अतुल सावेंकडून काढून धनंजय मुंडेंना मिळाले. दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांनाही पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे.
एकूणच राष्ट्रवादीची गाडी सुसाट आहे. आता या राष्ट्रवादीच्या तीन आमदारांची मंत्रिमंडळातील एन्ट्री निश्चित मानली जात आहे. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त ठरल्याची खात्रिशीर माहिती आहे. यात सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होणार आहे, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण व नगरचे आमदार संग्राम जगताप या दोघांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे.
सतीश चव्हाण मराठवाडा शिक्षण मंडळाचे सरचिटणीस आहेत. या संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांचे मराठवाडाभर जाळे आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी सतीश चव्हाण यांच्याकडून ‘आर्थिक भार’ उचलण्यात कधीच काटकसर नसते. भविष्यातील निवडणुकांचा विचार करूनच चव्हाण यांच्यासारख्या तगड्या नेत्याला मंत्रिपद देऊन पक्षाच्या बांधणीत त्यांचा हातभार लावून घेतला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.