Daund Election : दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारावर भर चौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली. जमावाकडून त्याला दौंड पोलिस ठाण्यासमोरच बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला तरी पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली.
आफताब जुनेद सय्यद (वय २३, रा. फौजदार चाळ, दौंड) या तरूणावर हल्ला करण्यात आला. दौंड शहरात १२ जानेवारी रोजी दुपारी वैयक्तिक रागापोटी जमावातील काही सदस्यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात आफताब याच्यावर कोयता उगारला होता. हा वार हुकवल्याने तो वाचला, परंतु जमावातील सदस्यांनी त्याला तेथेच रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. त्यानंतर आफताब सय्यद हा जीव वाचविण्यासाठी चौकातून पीडीसीसी बॅंक शाखा मार्गे पोलिस ठाण्याच्या दिशेने गल्लीतून पळत सुटला. जमाव त्याच्या पाठीमागे धावत असताना आफताब हा पळताना तो एका उतारावर घसरल्याने जमावाने त्याला बेदम तुडविले. त्यानंतर त्याला ओढत पोलीस ठाण्यासमोरील संविधान स्तंभासमोर आणून तेथे देखील लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आलं.
दौंड पोलिस ठाण्यासमोरच एक मोठा जमाव आफताब सय्यद याला हाणत असताना वाहतूक ठप्प झालेली असतानाही पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. पोलिस ठाण्यात मारणारा जमाव आणि ज्याला मारहाण झाली ते दोन्ही गट जमा झाले होते. शस्त्रे हातात घेऊन भरचौकात मारहाण करून पोलिस ठाण्यापर्यंत मारत आणणारेच पोलिस ठाण्यात हजर असताना त्यांना कोयता प्रकरणी साधा जाब सुद्धा पोलिसांकडून विचारण्यात आला नाही. बाजार पेठ, दौंड पोलिस ठाण्याच्या आतील व प्रवेश मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कोयता उगारण्यापासून बेदम मारहाण करण्यापर्यंतचे चित्रीकरण झालेले आहे.
मकर संक्रांतीमुळे बाजारपेठेत गर्दी असताना आणि भरचौकात वर्दळीच्या वेळी कोयता उगारून दहशत निर्माण केल्यानंतरही पोलिस प्रशासनाने कोणावरही कसलीही कारवाई केली नाही. कारवाई करण्यापेक्षा वरिष्ठांनी मौन बाळगणे पसंत केले. एरवी स्वतःहून फिर्यादी होत पोलिसांकडून समाजातील उपद्रवी घटकांवर कारवाई केली जाते. परंतू या प्रकरणात कोणतीही कारवाई केली गेली नाही. पोलिसांचा अजिबात धाक न राहिल्याने भरचौकात कोयता उगारण्यापर्यंत काही प्रवृत्तींची मजल गेली आहे.
दौंड नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत आफताब जुनेद सय्यद हा प्रभाग क्रमांक पाच-ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार होता. त्याला २,७२१ पैकी १४४ मते पडली होती. आफताब हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समाज माध्यम विभागाचा शहराध्यक्ष आहे.
या प्रकरणात तक्रार द्यायला कोणी आले नाही त्यामुळे गुन्हा दाखल नाही. संबंधितांना बोलविले आहे, तक्रार असेल तर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.