दौंड शहरातील मतदारांनी चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन करीत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे या 4891 मतांच्या फरकाने विजयी केले आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सदस्यपदाच्या 26 जागांपैकी सुज्ञ मतदारांनी क्रॉस व्होटिंग करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सदस्य निवडून देत स्थानिक समीकरणांना अधिक प्राधान्य दिले.
नागरिकहित संरक्षण मंडळ आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पराभूत झाल्या असल्या, तरी या आघाडीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी आघाडीचे 17 सदस्य निवडून आणत नगरपालिका राजकारणावरील वरचष्मा कायम राखला. ज्या मतदारांनी आघाडीला 17 सदस्यपदाच्या जागा दिल्या, त्यांनीच नगराध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पसंती दिल्याने नगराध्यक्षपदाची उमेदवारी तुल्यबळ नसल्याचा संदेश निकालातून दिला गेला.
दौंड नगरपालिकेच्या तीन वर्षांच्या विलंबाने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीतच थेट लढत झाली. प्रत्येक निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करणाऱ्या सशक्त भाजपने नगरपालिका निवडणूक न लढता स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. यंदा अनुकूल परिस्थिती असतानाही निवडणूक न लढता राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग भाजपने निश्चितपणे सुकर केला.
राष्ट्रवादीचे चिन्ह निश्चित असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, मात्र नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीला चिन्ह पोचविताना दमछाक झाली. यंदा प्रथमच प्रचारकाळात आरोप- प्रत्यारोप झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले.
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर व तालुक्यातील नेतेमंडळी नगरपालिकेच्या प्रचारात सक्रिय होती. त्या उलट आघाडीत सामाजिक रचना, जातीय व राजकीय समीकरणे आणि उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊन निर्णय घेणारे मुरब्बी प्रेमसुख कटारिया व त्यांना मोलाची साथ देणारे भाजपचे आमदार राहुल कुल हे दोघेच निवडणुकीचे सूत्र सांभाळत होते. नागरिक हित संरक्षण मंडळाकडून उमेदवारी देताना टोकाचा राजकीय वैर विसरून बेरजेचे राजकारण करण्याचा ऐनवेळचा प्रयत्न मतदारांना रुचला नाही.
उमेदवारांची निवड करण्यापासून त्यांना आवश्यक रसद आणि प्रचारसाहित्य पुरविण्यात आघाडी पुढे होती. सोईने निष्ठा बदलणारे, उपद्रवी, परस्परविरोधी तक्रारी करण्यात पुढे व टक्केवारीत बरबटलेल्या लोकांविषयी मतदारांच्या मनात प्रचंड रोष असताना त्यांच्याच सांगण्यावरून उमेदवारी देण्यात आल्याने निर्माण झालेल्या नाराजीचा ‘अंडर करंट’ काही नेतेमंडळींना लक्षात आला नाही. परिणामी निर्विवाद बहुमताची व नगराध्यक्षपदाची संधी हुकली.
कोरी पाटी, स्वच्छ राजकारणाचा वारसा आणि उच्चशिक्षित असल्याने मतदारांनी दुर्गादेवी जगदाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिस्पर्धी व त्यांची क्षमता पूर्णपणे माहीत होती तरीही ते गाफील राहिले. निवडून येण्यासाठी जे आवश्यक आहे ते करण्यात राष्ट्रवादी कमी पडली. सदस्यपदासाठी काही जागांवरील उमेदवारी चुकल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाकरिता असलेला एकजिनसीपणा सदस्यपदांच्या जागेत न दिसल्याने 9 सदस्य निवडून आले.
शहरात सार्वजनिक स्वच्छता आणि घन कचरा संकलनकरिता दररोज 1 लाख 23 हजार रूपये खर्च केले जात असतानाही संपूर्ण शहरात कचरा व दुर्गंधी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सप्टेंबर 2015 पासून दिवसाआड एक वेळ दूषित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाढती गुन्हेगारी, नित्य वाहतूक कोंडी, दौंड-गोपाळवाडी रस्ता भागात स्मशानभूमी व भाजी मंडईचा अभाव, दलित वस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंगची सुविधा नसलेली बाजारपेठ, वाढती अतिक्रमणे आणि बेरोजगारी व उच्च शिक्षणाच्या सुविधांचा अभाव, आदींवर चर्चा झाली पण उपाययोजना नाही.
शहरात सुविधांपेक्षा समस्या जास्त असल्याने मतदारांना परिवर्तन हवे होते व त्याकरिता मतदानातून सर्वांचेच स्वागत करीत ज्यांना त्यांना त्यांच्या जागेवर ठेवले आहे. मतदारांनी मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा (NCP) उमेदवार निवडून दिल्याने पक्षाला सूक्ष्म नियोजन करीत ठोस विकासकामे वेळेत पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही. ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हित जोपासण्यापेक्षा नागरिकांचे हित जोपासून थेट कृतींद्वारे शहराचा कालबद्ध विकास करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.