deepak mankar Sarkarnama
पुणे

Deepak Mankar : "दादा शब्द पाळतील वाटलं होतं, पण…", मानकरांनी व्यक्त केली खदखद; मोठा निर्णय घेणार?

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 7 आमदारांना शपथ देण्यात आली. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं असून पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना डावलल्याने शहरातील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपली भूमिका मांडली.

दीपक मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2012 पासून मी प्रामाणिकपणे काम करत आहे. 14 महिन्यापूर्वी मला पुणे शहराध्यक्ष पद सोपवण्यात आले. ती जबाबदारी देखील मी उत्तम प्रकारे पार पडत आहे. विधान परिषदेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एक जागा ही पुण्याला देण्यात यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती.ती दिल्यास शहरातील पक्ष संघटनेला बळ मिळेल असं कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांमधील तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तसंच याबाबतचा योग्य निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल असा शब्द देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला होता. अजित पवार (Ajit pawar) दिलेला शब्द पाळतात हे आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहे. त्यामुळे आम्हाला पुण्यात विधान परिषदेची आमदारकी मिळेल अशी अपेक्षा होती. आमचा अपेक्षाभंग झाला आहे.

कार्यकर्त्यांना दीपक मानकर यांना विधान परिषदेची (VidhanParishad) उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना ती न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होऊन संघटितपणे त्यांनी राजीनामा दिला आहे. मी त्यांना राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले असून मी स्वतः शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे. मात्र मी दादांसोबत कायम राहणार असून दादांना सोडून जाणार नाही असे देखील दीपक मानकर यांनी सांगितलं.

विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही याबाबत माझ्याशी वरिष्ठ पातळीवरती चर्चा होणार व्हावी अपेक्षित होतं. हे मेरिटमध्ये कमी पडलो हे त्यांनी सांगायला हवं होतं. माझ्याशी कोणीही चर्चा केली नाही त्यामुळे कोणतीही जबाबदारी न घेता कार्यकर्ता म्हणून काम शनिवारी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवारांकडे देणार असल्याचं दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी सांगितलं. मला इतर पक्षाकडून देखील ऑफर येत आहेत मात्र त्या ऑफर न स्वीकारता अजित पवारांना सोबतच पुढील राजकीय प्रवास सुरू ठेवील असे देखील यावेळी दीपक मानकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT