DCM Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: मंदिर परिसर स्वच्छतेचा कार्यकर्त्यांचा आग्रह; अजित पवारांनी 'दादा' स्टाईलने दिले 'हे' उत्तर !

Chaitanya Machale

Pune News : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार असून त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या काळात देशभरातील मंदिरांची स्वच्छता करून तेथे स्वच्छतेची मोहीम राबवावी, असे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर भाजपचे पदाधिकारी तसेच राज्यातील नेतेमंडळी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन तेथे स्वच्छता अभियान राबवत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवीचे दर्शन घेऊन तेथे स्वच्छता केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांनी आपापल्या भागातही स्वच्छता सुरू केली आहे. कोथरूड विधानसभेचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील तीन दिवसांपूर्वी कोथरुड येथील मृत्युंजय मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केली होती. त्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी कोथरुड परिसरातील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. एका कार्यक्रमासाठी अजितदादा सकाळी कोथरुड भागात आले होते. त्यावेळी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक श्याम देशपांडे उपस्थित होते. देशपांडे यांनी येथे जवळच राम मंदिर आहे, तेथे आपण दर्शनासाठी यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली. ही विनंती मान्य करीत अजितदादांनी डहाणूकर कॉलनीतील रामाचे दर्शन घेतले.

उपमुख्यमंत्री या मंदिरात येऊन दर्शन घेत असल्याने येथे उपस्थित असलेल्या राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भुवया मात्र चांगल्याच उंचावल्या होत्या. मंदिर परिसर स्वच्छ करण्याची गळ काही कार्यकर्त्यांनी यावेळी घातली. त्यावेळी मंदिर आणि परिसर स्वच्छ आहे, मग कशाची स्वच्छता करायची, असे उत्तर आपल्या 'स्टाईल'मध्ये देत अजित पवार तेथून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

याबाबत श्याम देशपांडे यांना विचारले असता, ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एका कार्यक्रमासाठी आले होते. मी त्यांना विनंती केली, त्यानंतर त्यांनी येथील राम मंदिरात येऊन दर्शन घेतले. पवारांनी मंदिर परिसर स्वच्छ केला का ? असे देशपांडे यांना विचारले असता ते म्हणाले, दादा अत्यंत स्पष्टवक्ते आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असल्याने ते स्वच्छता कशाला करतील, असं ते म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT